'एसटी'वर संपकाळात जे आतापर्यंत कुणीच बोललं नाही, ते राज ठाकरे बोलले

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, पण महिन्याभरात एसटीवर जे कुणीच बोललं नाही, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये बोलले

जयवंत पाटील | Updated: Dec 14, 2021, 08:08 PM IST
'एसटी'वर संपकाळात जे आतापर्यंत कुणीच बोललं नाही, ते राज ठाकरे बोलले title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, यात विविध मुद्दे समोर येत आहेत. पण महिन्याभरात एसटीवर जे कुणीच बोललं नाही, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये बोलले. विशेष म्हणजे एसटीच्या विलिनिकरणाची मागणी होत असताना, ही मागणी किंवा या मुद्द्यावर कुणीच बोललेलं नाही. यात संपकरी एसटी कर्मचारी, त्यांच्या विविध संघटना याविषयावर बोलत नाहीत. यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी पाठराखण करत मैदानात जे एसटी कर्मचाऱ्यांचे 'मसिहा' म्हणून उतरले ते देखील यावर बोलत नाहीत. 

म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन नरकयातना

राज ठाकरे आज जे काही बोलले ते एसटीच्या आजारावर बोलले, एसटीच्या याच कारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना संसार चालवणे 'ताप' झाला आहे आणि जीवन जगणे म्हणजे नरकयातना वाटायला लागल्या आहेत.

एसटीवर सर्व मजा मारतायत - राज ठाकरे

राज ठाकरे आज म्हणाले, एसटी ही महाराष्ट्राची फार जुनी संस्था आहे, त्यांना दिवाळीतही पगार दिले जात नाहीत, हे सत्य आहे. एवढी मोठी संस्था एसटी तोट्यात जाते कशी, एसटीवर सर्व मजा मारायला पुढे आहेत, म्हणून एसटीची ही अवस्था आहे, अर्थातच याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय.

हो हाच एक मुद्दा आहे, ज्यावर कुणीही बोलत नाही

हो हाच एक मुद्दा आहे ज्यावर कुणीही बोलत नाही, एसटीचा हा मुद्दा राज ठाकरे यांनी सांगितलाय, त्यापेक्षा प्रत्यक्षात तो आणखी भीषण आहे. एसटी भ्रष्टाचाराशिवाय तोट्यात गेलेली नाही. 

खालील मुद्दे राज ठाकरे यांच्या बोलण्यात आले नाहीत, पण हे सर्वांना माहित आहेत, पण यावर कुणीही बोलायला तयार नाही. एसटीच्या कारभारात पारदर्शकता नाही. गरज नसतानाही कोट्यवधींची कंत्राटं दिली गेली हे लपलेलं नाही, हे फक्त याच सरकारच्या काळात होतंय असं नाही, एसटीचे लचके वर्षानुवर्ष, प्रत्येक सरकारच्या काळात तोडले जात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पिढ्यांपिढ्या अंधारात गेल्या

एसटी जेवढी दुबळी होत गेली, याचा सर्वात मोठा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसला, त्यांच्या पिढ्यांपिढ्या अंधारात गेल्या. ते कामगार नाही तर गुलाम झाल्यासारखेच त्यांची आज स्थिती आहे.

बहुतांश संघटनांमध्ये बदली करणारे दलाल

एसटीत असे कर्मचारी आहेत, ज्यांना १०-१० वर्ष एसटीत नोकरी झाली, तरी त्यांच्या जिल्ह्यात त्यांची बदली नाही. मग एवढ्या कमी पैशात बायका-पोरांपासून दूर कसं जगतायत, हे कोणत्याही संघटनेनं मांडलं नाही, कारण बदल्या आणि त्यांच्या बदल्यात पैसा घेण्याचा रोग एसटीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना घराजवळ अटी नियमांनी बदली करुन देणं त्यांचा अधिकार आहे, मग हे एसटी प्रशासनाकडून होत नसेल, यात दिरंगाई होत असेल, तर हे पैशांसाठीच होतंय असं का म्हणू नये.

पैसे देऊन बदलीची शाश्वती नाही

विविध संघटनांची माणसं या बदल्यांमध्ये दलालाची कामं करतात, पगार धड १५ हजार नाही आणि बदलीसाठी ४० -४० हजार मोजावे लागतात, तरी देखील बदलीची शाश्वती नाही, म्हातारेआईवडील गावी तसेच दिवस काढतात.

बदलीच्या यादीत नाव येण्यासाठी सेटिंग्ज

एका एसटी ड्रायव्हरची बायको वारलीय, वडील वारले, २ लहान मुलं, ७५ वय ओलांडलेल्या आईकडे गावी राहतात, १० वर्षाच्या वर एसटीत नोकरी करुन झाली. पण एसटीच्या कोणत्याही यादीत त्याचं नाव नाही. सेटिंग वाल्यांची नावं येतात म्हणे.

एसटीचे रक्त पिणारे ढेकूण, मात्र घरी एसीत डाराडूर झोपतात

काही ठिकाणी एसटीत ड्रायव्हर, कंडक्टर झोपतात, त्याठिकाणी पाणी असं आहे की, त्यांना कातडीचे राग होत आहेत. ड्रायव्हरची झोप होणे आवश्यक असते, पण अनेक ठिकाणी ढेकून त्यांची झोप होवू देत नाहीत. 

एसटी ड्रायव्हर, कंडक्टरसाठी मुक्कामाची ठिकाणं तालुका आणि जिल्ह्यावरही यांना नीट नेटकी, स्वच्छ ठेवता आलेली नाहीत. स्वच्छता ठेवायलायही एसटी प्रशासनाला जमलेलं नाही. एसटीचे रक्त पिणारे ढेकूण, मात्र घरी एसीत डाराडूर झोपतात.

खरेदी- कंत्राटांवर भ्रष्टाचाराची प्रश्नचिन्हं का?

एसटीचं रोजचं एकूण उत्पन्न, रोजचा खर्च ऑनलाईन झाला, तर एसटी फायद्यात येईल. एसटीचं रोजचं उत्पन्न स्पष्ट होत नाही, इंधन किती लागलं, टायर खरेदी किती, जुने टायर विकून, भंगार विकून किती आले, जाहिरातीत किती आले याचा ताळमेळं नाही, त्या आधीच नवी कंत्राटं. तिकीट मशीन्स आणि गणवेश यांच्या खरेदी- कंत्राटांवर भ्रष्टाचाराची प्रश्नचिन्हं का?

एसटीचं मेन्टेन्स कोण वाढवतंय?

हिरकणीसारख्या चांगल्या बांधणीच्या गाड्यासोडून, बॅलेन्स नसलेल्या उंच-उंच गाड्या आणण्याची घाई का झालीय? चांगल्या दर्जेदार कमी मेन्टेन्स असणाऱ्या बसची निर्मिती का थांबलीय. बॅटरीकडून सूर्यप्रकाशावर चालणारी एसटी यायला हवी होती, तेव्हा खासगी बस का हव्या असतात कंत्राटात.

एसटीने एसटी आणि आगारात आपलंच पाणी विकलं तरी...

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात नदीचं पाणी स्वच्छ असेल अशा ठिकाणी स्वच्छ पाण्याचे प्लांट उभारुन एसटी स्वत:चं पाणी विकू शकत नाही का? उन्हाळ्यात एसटीने आपल्याच आगारात आपलं पाणी विकलं, तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार भरघोस वाढवून देता येतील.

एसटीचे लुटारु आता त्यांची सोन्याची कोंबडी मारतायत

हीच वेळ आहे, एसटी सुधारा नाहीतर ज्या एसटीचं रक्त पिणारे आहेत, त्यांना देखील ही सोन्याची कोंबडी हातात सापडणार नाही. एसटी ही सोन्याची कोंबडी त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी आहे. पण कर्मचाऱ्यांसाठी ती मायमाऊली आहे. पण एसटी भ्रष्टाचाराने आणि व्यवस्थापनाच्या अभावाने कमकुवत झाली असल्यामुळे विलिनीकरणाच्या माध्यमातून एसटी कर्मचारी मुक्तीचा मार्ग शोधतायत.