व्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात

भविष्यात येणाऱ्या नव्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतोय का ?

Updated: Nov 14, 2018, 07:51 PM IST
व्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात title=

मुंबई : आज सगळीकडे हातात मोबाईल घेऊन वावरणारे लोकं दिसतायेत. सोशल मीडियामध्ये अडकलेला माणूस खासकरून तरुणाई आता व्हिडीओ गेममध्ये अडकून पडली आहे. पण याचा थेट परिणाम त्याचं येणारं भविष्य आणि आरोग्यावर होत आहे. नकळत याचं त्यांना व्यसन लागत चाललं आहे. शहरातल्या तरुणांचं प्रमाण यात जास्त आहे पण ग्रामीण भाग देखील मागे नाही. काही दिवसांपूर्वी ब्लुव्हेल नावाचा गेम धुमाकूळ घालत होता. त्यामुळे अनेकांनी आपले प्राण देखील गमावले. सध्या पबजी या गेममुळे अनेक जण त्यात अडकून बसले आहेत. याचं जणू काही व्यसनच आजच्या तरुणाईला लागलं आहे.

मानसिक ताण वाढला

एकीकडे स्पर्धा वाढत असताना भारतीय तरुण मात्र सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेममध्ये अडकून पडलाय. या सगळ्या गोष्टीमुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. काही दिवसातच तरुणांना मनोसोपचार तज्ज्ञांची गरज भासू लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. मानसोपचाराची गरज असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर असून, महाराष्ट्र दुसऱ्या तर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना नैराश्याने ग्रासल्याचे समोर आले आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, व्हिडीओ गेम्सच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज भासु लागली आहे.

गेमचं व्यसन

माणसाच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे एक द्रव्य काम करत असतो. जो आपलं वागणं, बोलणं, लक्षात ठेवणं अशा विविध गोष्टीवर नियंत्रण ठेवत असतो. व्हिडीओ गेम खेळत असताना आपल्याला त्याचं व्यसन कधी लागतं हे आपल्याला कळतच नाही. याचं दरम्यान आपल्या मेंदुमधील डोपामिन हे द्रव्य विरघळत असतं. यामुळे रक्त उसळू लागतं आणि रक्तदाब वाढतो ज्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि अशा वेळी पॅनिक अटॅक देखील येऊ शकतो. याचे पुढे जाऊन अनेक दुष्परिणाम देखील होतात. दृष्टिदोष, डोकेदुखी, पचनक्रियेवर परिणाम, भीती वाटणे, बोटांची हाडं आणि स्नायुवर परिणाम होणे अशी लक्षणे आढळतात. मैदानी खेळ कमी होत असून व्हिडिओ गेम वाढत आहे. यामुळे मुलं त्यात हळूहळू गुंततात आणि मग मानसिकरित्या अडकतात.

स्मार्टफोन बनला स्मार्ट जुगार

मुंबईच्या लोकल पासून ग्रामीण भागात आणखी एक गेम चांगलाच चर्चेत आहेत तो म्हणजे लुडो. हा व्हिडिओ गेम कधी जुगार बनला हे कळलंच नाही. अनेक ग्रुपमध्ये आता हा पैशांवर खेळला जाऊ लागला आहे. तरुण कामधंदे सोडून आता याच्या नादात वेडे झाले आहेत.

भविष्यात देखील अनेक गेम येतील यात शंका नाही पण यामुळे तरुणांचं भविष्य उध्वस्त होत चाललय हे अनेकांच्या अजून लक्षातच आलेलं नाही. मुलांप्रमाणे पालक ही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. एकीकडे आज आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात तरुण असल्याने तरुणांचा देश म्हणून मिरवत आहोत पण हाच देशातला तरुण जर सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेमच्या नादात आपलं भविष्य खराब करणार असतील तर देश किती पुढे जाईल यात शंकाच आहे.