डेली सोपमधील 'या' कलाकारकडे रुग्णालयाचे बिल द्यायलाही नाहीत पैसे

अभिनेता १८ मे पासून रुग्णालयात दाखल आहे.  

Updated: May 21, 2020, 06:45 PM IST
डेली सोपमधील 'या' कलाकारकडे रुग्णालयाचे बिल द्यायलाही नाहीत पैसे title=

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता आशिष रॉय सध्या रुग्णालयात दाखल आहे. नुकताच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक मदतीची मागणी देखील केली होती. अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू कक्षात दाखल असलेल्या आशिष यांच्या कडे  आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी माझ्याकडे आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी एक रूपया देखील शिल्लक नसल्यांचं सांगितले होते. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आशिष १८ मे पासून रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांत त्यांचं रुग्णालयातील बिल २ लाख रूपये झालं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता  २ लाख रूपयांवरती एक रूपये देखील  शिल्लक नसल्याचे खुद्द आशिष यांनी सांगितले आहे.  

'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'ससुराल सिमर का', 'मेरे अंगने मे' आणि अशा कित्येक मालिकांमध्ये आशिषचा अभिनय पाहायला मिळाला आहे. पण, आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याला जीवनातील अतिशय कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे. 

मागील वर्षी आशिषला अर्थांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून प्रदीर्घ काळासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्याला काम मिळणंही बंद  झालं. त्याने साठवलेला सर्व पैसा हा उपचारांमध्येच खर्च झाला. त्यामुळं आता आशिष यांना चाहत्यांसोबतच कलावर्तुळातूनही मदत केली जाणं अपेक्षित आहे.