32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?

Raj Kiran Mystry: एक काळ गाजवणारा अभिनेता अचानक दिसेनासा होणं हे पाहून अनेकांनाच धक्का बसला. अनेक प्रयत्न करुनही त्याचा शोध लागू शकला नाही.   

सायली पाटील | Updated: Apr 16, 2024, 03:08 PM IST
32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?  title=
Actor Raj Kiran suddenly dissappeared from movies know his story

Raj Kiran Mystry: कलाविश्वाचा झगमगाट पाहून सर्वांनाच या अनोख्या जगताचा हेवा वाटतो पण, प्रत्येकवेळी 'दिसतं तसं नसतं' म्हणून जग फसतं, या वाक्याचा प्रत्यय येतो आणि याच कलाजगताची दुसरी बाजू समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकते. भारतीय चित्रपट जगतात अनेक कलाकार नावारुपास आले. काहींना अमर्याद लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तर काही कलाकार मात्र विस्मरणात गेले. याच कलाविश्वातून एक अभिनेता एकाएकी दिसेनासा झाला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तो नेमका कुठं आहे, कसा आहे याची तसुभर माहिती कोणालाही मिळू शकलेली नाही. 

80 चं दशक गाजवणारा असाच एक अभिनेता होता राज किरण. त्या काळात गाजलेल्या चित्रपटांमध्ये मध्यवर्ती आणि सहाय्यक अभिनेता अशा भूमिकांतून झळकलेल्या या अभिनेत्याचं अचानकच लुप्त होणं सहकलाकारांनाही धक्का देणारं होतं. 'कागज की नाव' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या राज किरणला खरी लोकप्रियता 'कर्ज'च्या प्रसिद्धीमुळं मिळाली. त्यानंतरही त्याचे काही चित्रपट प्रदर्शित झाले पण, ते फारसं चांगलं प्रदर्शन करु शकले नाहीत. 

'एक नया रिश्ता', 'घर एक मंदिर', 'बसेरा', 'बेजुबान', 'एक ही मकसद', 'वारिस', 'हिप हिप हुर्रे', 'प्यार का मंदिर' 'घर द्वार', 'सुन मेरी लैला', 'मनोकामना', 'मान अभिमान', 'घर हो तो ऐसा', 'शिक्षा', 'घर सुख' अशा चित्रपटांतून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. पुढे काळ बदलला आणि राज किरणला बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. पण, नंतर मात्र त्यांना हे कामही मिळणं बंद झालं आणि अनेकांच्या मते ते नैराश्याच्या छायेत गेले. 

सहकलाकारांनी घेतला शोध...

ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांनी 2011 मध्ये राज किरण यांचा शोध घेण्याच्या अनुषंगानं एक पोस्ट लिहिली. आपण ते न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवचत असल्याचं ऐकलं, अशी माहिती देत त्यापलिकडे या अभिनेत्याची कोणतीही माहिती आपल्याला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दीप्ती नवल, ऋषी कपूर या कलाकारांनी कसंबसं राज किरण यांच्या भावाशी संपर्क साधला. यावेळी ऋषी कपूर यांना त्यांच्या भावाकडून राज किरण अॅटलांटा इथं एका मनोरुग्णालयात असल्याची माहिती मिळाली होती. 

राज किरण यांची पत्नी, कथिजा नाचियार आणि मुलही रिषिका मथानी यांनी मात्र या अफवा असल्याचं सांगत अभिनेते राज किरण नेमके कुठं आहेत याची आपल्यालाही कोणतीच माहिती नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा कामाला लागल्या असतानाही या अभिनेत्याचा आजतागायत कुठंही थांगपत्ता लागला नसून, ते आजही बेपत्ताच आहेत.