ऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनानं जागतिक सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Updated: Oct 12, 2022, 07:59 PM IST
ऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास  title=

Dame Angela Lansbary: आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभिनेत्री डेम एन्जेलिया लॅन्सबरी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्या सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री होत्या. जवळपास 8 हून अधिक दशके त्यांनी विनोदी अभिनयापासून खलनायिकेच्या भुमिका साकारल्या आहेत. (actress dame angela lansbary dies at the age 96)

समोर आलेल्या माहितीनुसार एन्जेलिया यांचे त्यांच्या राहत्या घरी म्हणजे लॉस एंजेलिसला झोपेत निधन झाले. पाच दिवसांनी त्यांचा 97 वा वाढदिवस साजरा होणार होता परंतु त्याच्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं जागतिक सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

एन्जेलिया लॅन्सबरी या दीर्घ काळ चालत असलेल्या 'मर्डर: सी रॉट' या अमेरिकन टीव्ही मालिकेत गुन्ह्याची उकल करणाऱ्या गूढ लेखिकेची भूमिका साकारत होत्या. एन्जेलिया लॅन्सबरी यांनी अनेक चित्रपटांमधून सहाय्यक व्यक्तिरेखा निभावल्या आहेत एन्जेलिया लॅन्सबरी यांनी त्यांच्या लहानवयातच हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 

1944 मध्ये आलेला 'गॅसलाइट' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने कॉकनी नावाच्या मोलकरणीची भूमिका केली होती. एन्जेलिया लॅन्सबरी यांनी 1945 मध्ये 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' आणि 1962 मध्ये 'द मंचुरियन कँडीडेट'मध्ये काम केलं. या चित्रपटांतील त्यांच्या कामासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं होतं. एन्जेलिया लॅन्सबरी यांना नोव्हेंबर 2013 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी जीवनगौरवसाठी मानद ऑस्कर प्रदान करण्यात आला. 

एन्जेलिया लॅन्सबरी यांनी 'नॅशनल वेल्वेट' (1944), 'द डार्क अॅट द टॉप ऑफ द स्टार्स' (1960), 'बेडकनॉब्स अँड ब्रूमस्टिक्स' (1971) आणि 'द मिरर क्रॅक्ड' (1980) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.