हेराफेरी ३ : प्रेक्षकांना हसवायला बाबूभाई, श्याम आणि राजू पुन्हा एकत्र

अक्षय कुमार, परेश रावल, सुनिल शेट्टी ही तिकडी पुन्हा करणार हास्यकल्लोळ, 'हेराफेरी ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: Jan 31, 2019, 11:09 AM IST
हेराफेरी ३ : प्रेक्षकांना हसवायला बाबूभाई, श्याम आणि राजू पुन्हा एकत्र title=

मुंबई : बॉलिवूड ब्लॉकबस्टर 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' सिनेमातील अनेक डायलॉग आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात... प्रेक्षकांमध्ये या डायलॉगची क्रेझ आजही कायम आहे. बाबूभाई, श्याम, राजू या तिकडीच्या चाहत्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर आता 'हेराफेरी ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'हेराफेरी ३' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा होती. परंतु आता 'हेरा फेरी'चा तिसरा सिक्वेल लवकरच येणाच्या तयारीत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यात आली असून कॉमेडी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक इंद्र कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. इंद्र कुमार सध्या मल्टी स्टारर 'टोटल धमाल'च्या प्रदर्शन आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 'टोटल धमाल' प्रदर्शित झाल्यानंतर 'हेराफेरी ३'च्या चित्रीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. इंद्र कुमार चित्रपटाच्या स्क्रिप्टवर गेल्या मे महिन्यापासून काम करत आहेत. याआधी निर्माते फिरोज आणि अक्षय कुमार यांच्यातील काही वादामुळे चित्रपटाचे काम बंद करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा यावर काम सुरू करण्यात आले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मार्च २००० साली आलेला 'हेरा फेरी' आणि जून २००६ मध्ये आलेला 'फिर हेरा फेरी' या दोन चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. सुनिल शेट्टी, परेश रावल आणि अक्षय कुमार या तिकडीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 'हेरा फेरी'च्या या दोन सिरीज गाजल्यानंतर आता 'हेराफेरी ३' काय कमाल करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.