ऐश्वर्या आणि आराध्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह 

Bollywood Life | Updated: Jul 12, 2020, 03:11 PM IST
ऐश्वर्या आणि आराध्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  title=

मुंबई : बच्चन कुटुंबातील कोरोनाने शिरकाव केला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन या दोघींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

शनिवारी संध्याकाळी अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला. त्यानंतर कुटुंबातील आणि घरातील इतर व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यानंतर आता अशी माहिती मिळतेय की ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

बच्चन कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे. 'जलसा' मध्ये श्वेता अमिताभ आणि जया यांची मुलगी देखील आपल्या दोन मुलांसह राहण्यासाठी आली आहे. या तिघांचे आणि जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आले आहेत. 

'जलसा' बंगल्यांचे सॅनिटायझेशन करण्यात आले असून कन्टेन्मेंट झोन म्हणून तो बंगला घोषित केला आहे. महानगरपालिकेकडून तसा बोर्ड बंगल्याच्या बाहेर लावण्यात आला आहे. मार्च महिन्यात कोरोनाने महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हापासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच गेला आहे.