पिट्याभाई झाले नगरसेवक, 'सिंगल' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Asa Nagarsevak Hava Song : 'असा नगरसेवक हवा' 'सिंगल' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित! रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईला नगरसेवकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2023, 06:53 PM IST
पिट्याभाई झाले नगरसेवक, 'सिंगल' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला title=
(Photo Credit : Social Media)

Asa Nagarsevak Hava Song : आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून पिट्याभाई  राजकारणात का सक्रिय होतायेत? हा  प्रश्न तुम्हाला  ही पडला असलेच? तर  हे 'नगरसेवक' पद  त्यांनी आपल्या आगामी  ‘सिंगल’ या चित्रपटासाठी  स्वीकारलं आहे.  या चित्रपटात ‘नगरसेवक राजाभाऊ  सूर्यवंशी’  ही  भूमिका ते साकारणार आहेत. विशेष म्हणजे  ‘सिंगल’ चित्रपटात पुण्यातील  विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘सिंगल’च्या निमित्ताने मी प्रथमच पडद्यावर एका राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. राजाभाऊ सूर्यवंशी या भूमिकेने मला ही वेगळी संधी दिली असून माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास पिट्याभाई व्यक्त करतात.   

हेही वाचा : परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!

ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'सिंगल' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सिंपल आणि गोड अशी अमृता नामक व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे.या भूमिकेविषयी ती म्हणाली की, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. मी आजवर कॉलेजगोईंग भूमिका साकारली नव्हती.  अतिशय साधीसरळ मुलगी मी यात साकारली असून, 'सिंगल' चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या जॉनरची भूमिका करायला मिळाल्याचा आनंद आहे. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं असून या चित्रपटात आम्ही ‘फुल ऑन कल्ला’ केला आहे. मी चित्रपटात 'सिंगल' राहणार की 'मिंगल'  हे बघणं प्रेक्षकांसाठी धमाल अनुभव असणार आहे.'

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिगदर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे. 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या 'सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे.