'बाहुबली'फेम राणाच्या प्रकृतीविषयी नेटकरी चिंताग्रस्त

'भल्लालदेवला काय झालं?'

Updated: Oct 1, 2019, 05:19 PM IST
'बाहुबली'फेम राणाच्या प्रकृतीविषयी नेटकरी चिंताग्रस्त  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून 'भल्लालदेव' या भूमिकेद्वारे राणा डग्गुबती हा अभिनेता सर्वांच्याच भेटीला आला. त्याच्या या खलनायकी भूमिकेला इतकी लोकप्रियता मिळाली की, फक्त दाक्षिणात्य कलाविश्वातच नव्हे, तर विविधभाषीय प्रेक्षकांच्या मनावरही या 'भल्लालदेव'ने राज्य केलं. 

राजामौलींच्या दिग्दर्शनात साकारलेल्या राणाची एकंदर देहयष्टी त्यावेळी सर्वांनाच अवाक करुन गेली होती. पण, आता मात्र याच राणाविषयी चाहत्यांना काळजी वाटत आहे. यामागे कारणही तसंच आहे. नुकताच राणाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. एका जाहिरातीच्या निमित्ताने पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये राणात झालेले बदल पाहून काहींना विश्वासच बसला नाही. 

प्रथमदर्शनी तर कित्येकांना तो राणा डग्गुबती आहे, यावर विश्वासही बसला नाही. दाढी वाढवलेला आणि बरंच वजन कमी केलेला राणा पाहून त्याच्याविषयी अनेकांनीच चिंताही व्यक्त केली. त्याला या अशा रुपात पाहून, 'तू ठीक तर आहेस ना?', 'तुला काय झालं आहे.....?', 'भल्लालदेवला काय झालं?' असे अनेक प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले. 

राणाच्या प्रकृतीविषयीही अनेकांनीच काळजी व्यक्त केली. पण, चिंतेचं कारण नाही. राणाची प्रकृती उत्तम आहे. तो फक्त आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये बराच व्यग्र आहे. शिवाय त्या चित्रपटातील पात्राची गरज पाहताच तो तयारीला लागल्यामुळे त्याच्यात हे बदल दिसत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिच्यासोबत तो आगामी चित्रपटातून झळकणार आहे.