'सब खत्म करने का इरादा...'; म्हणत अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लामचा मार्ग

इस्लामच्या मार्गावर गेलेल्या अभिनेत्रीचं बदललेलं रुप पाहून चाहतेही हैराण... 

Updated: Oct 8, 2022, 12:07 PM IST
'सब खत्म करने का इरादा...'; म्हणत अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लामचा मार्ग  title=
bhojpuri Actress Sahar Afsha leaves film insustry for islam shares a post

मुंबई : मनोरंजन विश्वाचा (Entertainment) झगमगाट अनेक कलाकारांच्या आयुष्याला वेगळीच आणि अनपेक्षित कलाटणी देऊन जातो. पण, या विश्वात रमत त्याच्याशी एकरुप होणं मात्र सर्वांनाच जमतं असं नाही. आज अशी किती नावं तुम्हीआम्ही पाहिली असलीत ज्यांनी या मनोरंजनाच्या वर्तुळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाची कारणं वेगळी होती. 

कोणी खासगी आयुष्यासाठी तर कोणी चक्क धर्मासाठी या जगताला अलविदा केलं. धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी फिल्मी जगताला रामराम ठोकणाऱ्यांच्या यादीत आता एका अभिनेत्रीच्या नावाची जोड मिळाली आहे. 

इन्स्टाग्रामच्या (instagram) माध्यमातून एक पोस्ट लिहित या अभिनेत्रीनं आपण, या क्षणभंगुर विश्वाला अलविदा करुन इस्लामचा (islam) मार्ग स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. अल्लाहच्या सेवेत उरलेलं आयुष्य समर्पित करणारी ही अभिनेत्री आहे सहर अफशा (Sahar Afsha). (Sahar Afsha leaves film insustry for islam shares a post)

अधिक वाचा : लोकप्रिय अभिनेत्यानं आवळला गळा; सेलिब्रिटी पत्नीच्या गंभीर आरोपांमुळं वकिलही हादरले 

झायरा वसिम (zaira wasim), सना खान (sana khan) यांच्या मागोमाग आता भोजपूरी अभिनेत्री सहर अफशानंही एका वेगळ्या विश्वाचा स्वीकार केला आहे. 'मी निर्णय घेतला आहे की या झगमगणाऱ्या विश्वाला आता सोडायचं. आता माझा याच्याशी कोणताही संबंध नाही. पुढचं आयुष्य मी इस्लामची शिकवण आणि अल्लाहच्या कृपेनं जगण्याचा मानस ठेवते', असं लिहित तिनं सध्याच्या आयुष्यापासून दुरावा पत्करला. 

योगायोगानं कलाजगतात आले असं म्हणत आता मात्र हा प्रवास इथं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. सहरची ही पोस्ट पाहून सना खाननं आनंद व्यक्त केला आहे. प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या या अभिनेत्रीनं घेतलेला निर्णय पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे. ओघाओघानं तिच्या या निर्णयामुळं पुन्हा एकदा इस्लामच्या मार्गावर आयुष्य वाहणाऱ्या अभिनेत्रींच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.