VIDEO : 'परफेक्ट' वयोवृद्ध व्यक्तीला ओळखलं?

सध्या ओळखीचा एक चेहरा सर्वांना पेचात पाडत आहे. 

Updated: Mar 22, 2019, 09:05 AM IST
VIDEO : 'परफेक्ट' वयोवृद्ध व्यक्तीला ओळखलं?  title=

मुंबई : कोणत्याही व्यक्तीचं वय जसजसं वाढत जातं तसतशी त्या व्यक्तीची चेहरेपट्टीही बदलत जाते. वयानुसार चेहरा बदलतो. अनेकदा काही व्यक्तींना बऱ्याच वर्षांनंतर पाहिल्यावर त्यांची ओळखही पटत नाही. पण, अथे मात्र रोजच्याच ओळखीचा एक चेहरा सर्वांना पेचात पाडत आहे. तो आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून भेटतो, जाहिरातींच्या आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या माध्यमातूनही भेटतो. पण, त्याची ओळख मात्र पहिल्या दृष्टीक्षेपात काही केल्या पटत नाही आहे. तो चेहरा म्हणजे..... अभिनेता आमिर खान याचा. 

चित्रपटांमध्ये असणाऱ्या वैविध्यासोबतच आमिरचे तितकेच वैविध्यपूर्ण लूकही चाहत्यांच्या विशेष आवडीचे. असाच एक लूक सध्या खुदद् आमिरनेच प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये आमिर चक्क वयोवृद्ध  आणि एका पूर्ण टक्कल असलेल्या व्यक्तीच्या रुपात आपल्या समोर येतो. हा लूक नेमका कसा साकारला गेला याची धावती झलक त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 

Coming Soon...aapke phone pe... असं त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आमिरचं हे परफेक्ट म्हातारपण, कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे आमिर याआधी कधीच पूर्णपणे टक्कल असलेल्या किंवा अशा प्रकारच्या रुपात प्रेक्षकांसमोर आला नव्हता. त्यामुळे त्याचा हा लूक सध्या प्रचंड चर्चेत आहे. 

परफेक्शनिस्ट आमिरने त्याचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. व्हिडिओच्या शेवटी समोर येणाऱ्या वयोवृद्ध रुपातील आमिर पाहून, त्याला ओळखताच आलं नाही असं कोणी म्हणालं, तर कोणी त्याच्या परफेक्शनची प्रशंसा केली. कोणी नुसतच 'सुपर....' असं म्हणत त्याच्या या लूकची दाद दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमिरचं हे 'परफेक्ट' म्हातारपणही गाजत आहे, असं म्हणायला हरकत नाही.