स्वत:च्याच मुलांविषयी आयुषमान असं काही म्हणाला की...

....म्हणून त्याची प्रत्येक भूमिका

Updated: Oct 7, 2019, 10:49 AM IST
स्वत:च्याच मुलांविषयी आयुषमान असं काही म्हणाला की...  title=

मुंबई : 'बधाई हो', 'अंधाधुन' अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराना याने कायमच त्याचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. आयुषमानने कायमच एक पती, पिता आणि अभिनेता म्हणून त्याची प्रत्येक भूमिका लिलया पेलली आहे. मुख्य म्हणजे खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या जीवनात त्याने योग्य तो समतोल राखला आहे.

एक अभिनेता म्हणून तो जितका यशस्वी आहे तितकाच एक पिता म्हणूनही तो काही जबाबदाऱ्यांवर विशेष लक्ष देत आहे. यापैकीच एक बाब म्हणजे त्याच्या मुलांना माध्यमांपासून दूर ठेवण्याची. सहसा छायाचित्रकारांची गर्दी, चाहत्यांची गर्दी या साऱ्यांमध्ये आपल्या मुलांना काही गोष्टी लक्षात आणून देण्याकडे आयुषमानचा नेहमीच कल असतो. 

मुलांविषयीची अशीच एक बाब स्पष्ट करत आयुषमान म्हणाला, 'त्यांचंसुद्धा सर्वसामान्य मुलांप्रमाणेच संगोपन केलं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आमचं झालं होतं. हे त्यांच्याच चांगल्यासाठी मी सांगत आहे'. मुलांना त्यांच्या बालपणापासूनच ते एक सेलिब्रिटी असल्याची जाणीव होऊ नये, यासाठीच आयुषमान हे प्रयत्न करत आहे. 

कोणतीही गोष्ट त्यांनी पूर्ण जिद्दीने आणि कष्टानेच शिकावी, यासाठी आग्रही असणाऱ्या आयुषमानने कायमच त्याच्या पत्नीसोबत त्याच अनुशंगाने त्यांचं संगोपन केलं आहे. आताही विविध कार्यक्रम आणि समारंभाना ही सेलिब्रिटी जोडी कधीच त्यांच्या मुलांना म्हणजेच विराजवीर आणि वरुष्काला फारसे प्रकाशझोतात आणत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जोडी आदर्श पालकत्वाचं सुरेख उदाहरण देत आहेत, असं म्हणायला हरकत नाहीत.