मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरु असणारं आरोप प्रत्यारोपांचं सत्र काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्यानंतर कलाविश्वात काही कलाकारांनी नानांची पाराखण केली तर काहींनी तनुश्रीची.
बी- टाऊनमध्ये खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणानंतर नाना पाटेकर त्यांच्या आगामी ‘हाउसफुल्ल ४’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जात नसल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिने काही दिवसांपूर्वी नानांसोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्यावरुनही तनुश्रीने नानांचा स्वभाव माहित असतानाही फराह त्यांच्यासोबत काम करते असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
या प्रकरणाला दर दिवसाआड नवं वळण मिळत असतानाच आता या ‘हाऊसफुल्ल ४’ च्या सेटवरील नवा फोटो पाहता नानांनी खरंच चित्रीकरणाला येणं टाळलं की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाना पाटेकर सध्याच्या घडीला चित्रीकरणाला येण्याच्या मनस्थितीत नसल्याचं कळत असून, त्यांचा सहभाग असणाऱ्या दृश्यांचं चित्रीकरण हे खुद्द साजिद खाननेच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर पुढे नेमकं कोणतं वळण पाहायला मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.