लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे 'हाऊसफुल्ल 4' मधून नानांचा पत्ता कट?

जाणून घ्या नेमकं असं झालं तरी काय....

Updated: Oct 13, 2018, 08:50 AM IST
लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे 'हाऊसफुल्ल 4' मधून नानांचा पत्ता कट?  title=

मुंबई:  अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनतर त्याचा परिणाम आता नानांच्या कामावरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नानांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर या विषयाला वाचा फुटली. ज्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं. नानांची कलाविश्वात असणारी प्रतिमाही मलिन झाली. 

सध्याच्या घडीला नाना 'हाऊसफुल्ल 4' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्याचं कळत होतं. किंबहुना तनुश्रीच्या आरोपांनतर नानांनी चित्रीकरणाला काही दिवस दांडी मारल्याचंही स्पष्ट झालं होतं. 

#MeToo चा ट्रेंड पाहता नानांमागे असणारी ही संकटं काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत हेच आता पाहायला मिळत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार 'हाऊसफुल्ल 4' या चित्रपटातून नानांना वगळण्यात येणार असल्याचं कळत आहे. 

कलाविश्वात असणारं नानांचं स्थान पाहता त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्काच ठरु शकतो. त्यामुळे आता याविषयीच्या अधिकृत माहितीकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्यांसोबत आपण काम करणार नसल्याचं म्हणत एक ट्विट केलं होतं. ज्यानंतर ही पावलं उचलण्यात आल्याचं कळत आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर साजिद खाननेही चित्रपटाच्या दिग्दर्शनातून काढता पाय घेतला होता.