राजकुमारवर हलाखीची परिस्थिती आली अन्....

कपडे खरेदी करण्यासाठीही त्याच्याकडे अनेकदा पैसे नसायचे.... 

Updated: Oct 22, 2019, 06:00 PM IST
राजकुमारवर हलाखीची परिस्थिती आली अन्....  title=
राजकुमारवर हलाखीची परिस्थिती आली अन्....

मुंबई : सेलिब्रिटींच्या वर्तुळात वावरणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याविषयी सर्वांनाच हेवा वाटतो. पण, या सेलिब्रिटींच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी, लोकप्रियता आणि यश हे काही सहजासहजी आलेलं नसतं. याचा प्रत्यय अभिनेता राजकुमार राव याच्या एका मुलाखतीतून येत आहे. सध्याच्या घडीला प्रसिद्धीझोतात असणाऱ्या आणि प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव यालाही चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळात काही अडचणींचा सामना करावा लागला होता. 

२०१० या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लव्ह, सेक्स और धोखा' या चित्रपटातून राजकुमारने बॉलिवूडवर पदार्पण केलं होतं. याच राजकुमारवर एक वेळ अशीही आली होती जेव्हा त्याच्याकडे फक्त १८ रुपये शिल्लक राहिले होते. हलाखीच्या याच परिस्थितीविषयी त्याने 'पिंकव्हिला'शी संवाद साधत काही माहिती दिली. 

'मी या शहरात आलो होतो तेव्हा आम्ही एका अतिशय लहान घरात राहत होतो. मी त्या घरात राहण्यासाठी ७ हजार रुपये भाडं देत होतो. त्यावेळी मला ही रक्कम जास्तच वाटत होती. मला त्यावेळी महिन्याभरासाठी साधारण १५ ते २० हजार रुपये लागायचे. त्याचवेळी माझ्या खात्यात १८ रुपयेच शिल्लक राहिल्याचे मेसेज मला यायचे', असं राजकुमार म्हणाला. 

आपण एका अतिशय सर्वसाधारण अशा कुटुंबातून आल्याचं सांगत शालेय जीवनामध्ये असताना तर पैशांअभावी जवळपास दोन वर्षे शिक्षकांनीच आपली शालेय फी भरल्याचं राजकुमारने सांगितलं. 'एफटीआयआय' या संस्थेमध्ये शिक्षण धेत असतानाही आर्थिक परिस्थितीत फार काही बदल झाले नव्हते, असं सांगत अनेकदा साधं टी- शर्टही खरेदी करता येत नव्हतं या एकाच ओळीत त्याने त्याचा भूतकाळ सर्वांसमोर ठेवला. 

बालपणीपासूनच काही अडचणींचा सामना करत आर्थिक परिस्थितीमुळे खचून न जाता राजकुमारने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करणं सुरुच ठेवलं. अखेर जिद्द, चिकाटी आणि समर्पकतेच्या बळावर त्याने स्वत:चं वेगळं अस्तित्व प्रस्थापित केलं.