'म्हारी दादी चल बसी....', आजीच्या निधनाने रणदीप हुडा भावूक

त्यांचं हे  नातं किती दृढ होतं याचा सहज अंदाज लावता येत आहे.   

Updated: May 28, 2019, 09:35 AM IST
'म्हारी दादी चल बसी....', आजीच्या निधनाने रणदीप हुडा भावूक  title=

मुंबई : बॉलिवूड विश्वावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता अजय देवगण याचे वडील, प्रसिद्ध साहसी दृश्य दिग्दर्शक आणि 'स्टंटमॅन' वीरू देवगण यांनी सोमवारी जगाचा निरोप घेतला. एकिकडे अजयचं कुटुंब दु:खात असतानाच दुसरीकडे बी- टाऊनमधील आणखी एका कलाकाराच्या कुटुंबातही शोककळा पसरली. अभिनेता रणदीप हुडा याच्या आजीचं निधन झाल्याची माहिती त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 

आजीसोबतचे काही फोटो पोस्ट करत त्याने आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आज आपल्यात नसल्याचं सांगितलं. 'म्हारी दादी चल बसी....', असं म्हणत रणदीपने आजीविषयीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ९७ वर्षांच्या आयुष्यात आजीने कायमच इतरांना आनंद आणि प्रेरणा दिली हेसुद्धा त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याने पोस्ट केलेले फोटो पाहता आजीसोबतचं त्याचं नातं किती दृढ होतं याचा सहज अंदाज लावता येत आहे.

रणदीपने नेहमीच अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप सोडली. चौकटीबाहेरील विषयांना न्याय देणाऱ्या चित्रपटांची निवड करण्यापासून ते अगदी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत मांडण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. आपल्या व्यग्र वेळापत्रकात हा अभिनेता त्याच्या कुटुंबालाही तितकच महत्त्व देतो. सोशल मीडियावरील त्याच्या एकंदर पोस्ट पाहता ही बाब लगेच लक्षात येते. अशा या अभिनेत्याने त्याची आजी गमावल्यामुळे या दु:खच्या प्रसंगात चाहत्यांनीही कमेंटच्या माध्यमातून त्याला धीर दिल्याचं पाहायला मिळत आहे.