आणखी एका अभिनेत्याच्या मदतीला धावला सलमान; भरली सर्व बिलं

त्याच्या कुटुंबानं ऑनलाइन फंडसाठी सर्वांनाच आवाहनही केलं आहे

Updated: Oct 15, 2020, 12:06 PM IST
आणखी एका अभिनेत्याच्या मदतीला धावला सलमान; भरली सर्व बिलं  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कलाविश्वात नावारुपास आलेले अनेक सेलिब्रिटी हे जनमानसात त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठीही ओळखले जातात. बहुविध मार्गांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढं सरसावणाऱ्या या कलाकारांच्या यादीतील एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता सलमान खान याचं. सलमाननं पुन्हा एकदा त्याच्या दानशूरपणाचा दाखला दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या 'मेहंदी' या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता फराज खान याच्या मदतीसाठी सलमान पुढं आला आहे. फराज सध्या बंगळुरू येथील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ब्रेन इन्फेक्शननंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं कळत आहे. 

फराजच्या कुटुंबानं ऑनलाइन फंडसाठी सर्वांनाच आवाहनही केलं आहे. ज्यावर आता सलमाननंच मदतीचा हात पुढं केला आहे. फराजच्या आजारपणाबाबत कळताच अभिनेत्री पूजा भट्ट हिनं त्याच्या मदतीसाठी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यानंतर आता अभिनेत्री कश्मीरा शाह हिनं एक पोस्ट लिहित सलमाननं फराजसाठीच्या सर्व बिलांची रक्कम भरल्याची माहिती दिली. सलमाननं केलेल्या या मदतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी पुन्हा एकदा भाईजानची प्रशंसा करण्यात सुरुवात केली. 

'तू खरंच एक महान व्यक्ती आहेस. फराजवरील उपचारांची बिलं भरण्यासाठी, त्याला आर्थिक मदत करण्यासाठी तुझे खूप आभार', असं कश्मीरानं सलमानचा एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार फराज मागील पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (स्नायु विकार) या आजारामुळं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. फराजचा भाऊ फहमान खान यानं दिलेल्या माहितीनुसार त्याच्या उपचारासाठी जवळपास २५ लाख रुपये इतक्या रकमेची गरज आहे.