'कंगनाला जीव जाईपर्यंत मारलेलं, माझ्यावर जवळपास एक लिटर ऍसिड फेकलेलं....'

कंगनाच्या बहिणीने सर्वांसमोर आणलं तिच्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याचं वास्तव  

Updated: Oct 2, 2019, 05:43 PM IST
'कंगनाला जीव जाईपर्यंत मारलेलं, माझ्यावर जवळपास एक लिटर ऍसिड फेकलेलं....'  title=
'कंगनाला जीव जाईपर्यंत मारलेलं, माझ्यावर जवळपास एक लिटर ऍसिड फेकलेलं....'

मुंबई : सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग कलाविश्व. सर्वत्र अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल चर्चेचा विषय ठरतात. कंगना ही तिच्या ठाम भूमिकांसाठी कायम वादाच्या भोवऱ्यात अ़डकते. तर, रंगोली ही कायम कंगनाची पाठराखण करत, तिच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घेत असते. अशा या बहिणींच्या जीवनातील एक असाच वेदनादायक प्रसंग सर्वांसमोर आला आहे, ज्याविषयी वाचून मन विचलीत होऊ शकतं. 

खुद्द कंगनाच्या बहिणीने म्हणजेच रंगोलीने तिच्यावर झालेला ऍसिड हल्ला आणि त्यानंतर कंगनाला झालेली बेदम मारहाण, याविषयीचा खुलासा केला. या हल्ल्यानंतर पूर्णपणे कोलमडलेल्या रंगोलीने कशा प्रकारे काही व्यक्तींच्या सहाय्याने पुन्हा एकदा विखुरलेला आत्मविश्वास एकवटला याविषयी माहिती दिली. 

महाविद्यालयीन दिवसांमधील एक फोटो शेअर करत, तो फोटो काढल्यानंतरच आपल्यावर ऍसिड हल्ला झाल्याचं तिने सांगितलं. 'हा फोटो काढल्यानंतर काही वेळानेच ज्या मुलाच्या प्रपोजलला मी नाकारलं होतं, त्याने एक लिटर ऍसिड माझ्या चेहऱ्यावर फेकलं होतं. माझ्यावर जवळपास ५४ शस्त्रक्रिया झाल्या. त्याचवेळी माझ्या लहान बहिणीची छेड काढत तिला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती..... का....?, असा प्रश्न तिने उपस्थित केला ज्याचं उत्तरही तिने दिलं. मुलींना आजही चांगली वागणूक दिली जात नाही, तेव्हा आता या क्रूरतेशी लढा देण्याची वेळ आली आहे, निदान आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे होणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. 

आपलं सौंदर्य हरपल्याचं अनेकांना दु:ख झाल्याचं सांगत रंगोलीने तिच्या मनातल्या वेदना सर्वांसमोर ठेवल्या. आपले अवयव डोळ्यांसमोर वितळत होते, ५४ शस्त्रक्रियांनंतरही रंगोलीचा कान डॉक्टर नीट करु शकले नाहीत. हेच वास्तव मांडत मुलाच्या जन्मानंतर त्याला स्तनपान करतेवेळी इजा पोहोचलेल्या शरीराच्या त्या भागातील वेदना आणि अडचणींची जाणीव झाली, असं तिने स्पष्ट केलं. 

आजही आपल्याला त्य़ा वेदना सतावत असल्याचं सांगत ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसाठी आजही फारशी तरतूद करण्यात न आल्याची खंत तिने व्यक्त केली. ऐन तारुण्यात झालेल्या या वेदनादायक हल्ल्यातून बचावण्यासाठी कंगना, आई- वडील आणि आपल्या पतीची (तेव्हाचा मित्र) फार मदत झाली हे तिने न विसरता सांगितलं.