...म्हणून राधिकाने लग्नाच्या दिवशी नेसली आजीची विरलेली साडी

त्याविषयीच सांगताना राधिका म्हणाली.... 

Updated: Oct 15, 2019, 06:15 PM IST
...म्हणून राधिकाने लग्नाच्या दिवशी नेसली आजीची विरलेली साडी  title=

मुंबई : हिंदी, तामिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू करणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटे हिच्याविषयी कायमच चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं आहे. चित्रपटांपासून ते बेव सीरिजपर्यंत सर्वच ठिकाणी कायमच राधिकाने तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. 

साचेबद्ध भूमिका आणि चित्रपटांना दूर सारत काही आव्हानात्मक भूमिका साकारण्याकडे तिचा कायमच कल. अशी ही अभिनेत्री बऱ्याच बाबतीत ठाम वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. रुचतील आणि पटतील अशीच वक्तव्य करणारी राधिका फक्त अभिनय विश्वातच नव्हे, तर मॉडेलिंग क्षेत्रातही चांगलीच नावाजली गेली आहे. 

कामाच्या व्यापात सतत गुंतलेली असतानाही ती कुटुंबालाही तितकंच प्राधान्य देते. किंबहुना शक्य त्या सर्वच प्रसंगांना ती विविध मार्गांनी जणू कुटुंबाची साथ जपत असते. याचाच प्रत्यय आला राधिकानेच सांगितलेल्या एका आठवणीतून. 

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावं अशीच इच्छा प्रतच्येक मुलीची असते. अर्थात राधिकाचीही अशीच इच्छा होती. तिने ती पूर्णही केली. यामध्ये खास साथ दिली ती म्हणजे तिच्या आजीच्या साडीची. राधिकाने लग्नाच्या दिवशी तिच्या आजीची साडी नेसली होती. 

'मी जेव्हा विवाहबंधनात अडकले तेव्हा मी नोंदणी पद्धतीने होणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी मी आजीची साडी नेसली होती. ती साडी इतकी विरली होती, की त्यावर बारीक छिद्र पडली होती. पण, तरीही मी ती साडी नेसली. कारण, आजी ही या विश्वातील माझी सर्वात आवडती आणि जवळची व्यक्ती होती', असं राधिका म्हणाली. 

साध्या नोंदणी पद्धतीने होणाऱ्या एका विवाहसोहळ्यासाठी अमाप खर्च करणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत सुंदर दिसण्याची आपलीही इच्छा होतीच हे राधिकाने स्पष्ट केलं. लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला आपण, अगदी शेवटच्या क्षणी एक चांगला पण, तितकाच कमी किंमतीचा ड्रेस खरेदी केल्याचंही तिने सांगितलं. एकंदरच सेलिब्रिटी  राधिका आपटेचं तिच्या आजीशी असणारं सुरेख नातं या निमित्ताने सर्वांसमोर आलं.