सलमान खाननंतर आता 'या' अभिनेत्रीला धमकीचे पत्र

स्पष्टवक्ते पणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'या' अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी 

Updated: Jun 29, 2022, 09:39 PM IST
 सलमान खाननंतर आता 'या' अभिनेत्रीला धमकीचे पत्र title=

मुंबई : पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधल्या कलाकारांना धमक्या देण्याची मालिका सुरुच झाली आहे. मध्यंतरी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता एका बॉलिवूड अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे बॉलिवूड हादरले आहे.  

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे.  स्पीड पोस्टद्वारे खाजगी निवासस्थानी तिला हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. हे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर स्वराने तात्काळ स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. 

मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
अभिनेत्री स्वरा भास्करला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे पत्र अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने दोन दिवसांपूर्वी वर्सोवा पोलिस स्टेशन गाठले आणि अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली.

पत्रात काय?
वीर सावरकरांचा अपमान देशातील तरुण खपवून घेणार नाही, असे हिंदीत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. स्वरा भास्करने वीर सावरकरांबद्दल यापूर्वी केलेली वादग्रस्त विधान धमकीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिस तपास करत असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.