'दोस्ताना २'मधून नवा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला

कलाकारांना टक्कर देण्यासाठी तो सज्ज 

Updated: Sep 5, 2019, 01:11 PM IST
'दोस्ताना २'मधून नवा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून नवोदित कलाकारांची बरीच चलती पाहायला मिळत आहे. निर्माते- दिग्दर्शकही या नव्या चेहऱ्यांना संधी देत आहेत. अशाच या नव्या कलाकारांमध्ये आता आणखी एक अभिनेता त्याचं नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. खुद्द करण जोहरनेच याविषयीची माहिती सर्वांसमोर आणली. 

'दोस्ताना' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात, म्हणजेच 'दोस्ताना २'मधून या चेहऱ्याची भेट सर्वांनात घेता येणार आहे. इतकच नव्हे, तर जान्वही कपूर आणि कार्तिक आर्यन या नव्या आणि प्रसिद्धीझोतात असणाऱ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्याला मिळणार आहे. तो अभिनेता म्हणजे लक्ष्य. 

'बॉम्बे टाईम्स'शी संवाद साधताना करणने याविषयीची माहिती दिली होती. 'हिंदी कलाविश्वात नव्या कलाकारांना संधी देण्यावर आमचा विश्वास आहे.  गेल्या काळात जवळपास २१ कलाकारांना आम्ही संधी दिली, ज्यांमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. याच कुटुंबात आता लक्ष्यची नव्याने भर पडत आहे. दोस्ताना २ या चित्रपटातून आम्ही त्याला ही संधी देत आहोत', असं करण म्हणाला. 

बऱ्याच ऑडिशननंतर त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं सांगत, त्याच्या साथीने रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा अविष्कार करण्यासाठीचा आशावादही त्याने व्यक्त केला. 

खुद्द लक्ष्यनेही त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरुन याविषयीची माहिती दिली. धर्मा प्रोडक्शन्सकडून आपल्याला देण्यात आलेल्या या संधीबद्दल त्याने आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. सोबतच त्याची कामाप्रतीची उत्सुकताही लपून राहिलेली नव्हती. तेव्हा आता करणचा हा नवा स्टुडण्ट या झगमगत्या विश्वात त्याची छाप पाडण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Collin D'Cunha  दिग्दर्शित 'दोस्ताना २' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे.