मोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा

निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी ‘नो एण्ट्री 2’ पाठोपाठ 'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचेही संकेत दिले. 

नम्रता पाटील | Updated: Mar 31, 2024, 04:04 PM IST
मोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा title=

Mr India 2 Movie Updates : नव्वदीच्या दशकातील सुपरहिट चित्रपट म्हणून ‘मिस्टर इंडिया’ला ओळखले जाते. या चित्रपटामध्ये अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हा चित्रपट 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात तब्बल 10 कोटींचा गल्ला जमवला होता. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसत आहे. या चित्रपटाला 36 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे दिग्दर्शक निर्माते बोनी कपूर यांनी मोठी घोषणा केली आहे. 

शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटामुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. आता निर्माते बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी ‘नो एण्ट्री 2’ पाठोपाठ 'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचेही संकेत दिले. 

'मिस्टर इंडिया'चा सीक्वेल करणार

"मी फक्त ‘नो एण्ट्री 2’ चा नव्हे तर श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'मिस्टर इंडिया'चाही सीक्वेल करणार आहे. माझ्या अनेक क्रू मेंबर्सला मी 'मिस्टर इंडिया 2' हा चित्रपट बनवू नये, असं वाटतं आहे. कारण यातील बहुतांश कलाकार हे आता या जगात नाहीत. यात श्रीदेवी, अमरीश पुरी, सतीश कौशिक यांची नावे आहेत. तर शेखर कपूर हे दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. पण माझ्या मनात कुठेतरी 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाचा दुसरा भाग बनवावा असे वाटत आहे", असे बोनी कपूर म्हणाले. 

"'मिस्टर इंडिया 2' चित्रपटासाठी माझ्याकडे अनेक ऑफर्स आल्या आहेत. मला अनेकांनी विविध ऑफर्सही दिल्या आहेत. एका मोठ्या प्रतिष्ठित स्टुडिओने याबद्दल माझ्याशी चर्चाही केली आहे. त्यांनी मला मोठी आणि चांगली ऑफर दिली आहे. तसेच त्यांनी तुम्ही हा चित्रपट बनवा, बजेटची किंवा पैशांची चिंता करु नका, असे सांगितले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात मी तुम्हाला 'मिस्टर इंडिया 2' बद्दल मोठी अपडेट नक्की देईन", असे बोनी कपूर यांनी सांगितले. 

1978 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

दरम्यान शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट 25 मे 1978 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. तर याचे पटकथा लेखन सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी केलं आहे. या चित्रपटात अनिल श्रीदेवीचा रोमान्स आणि अमरीश पुरींनी साकारलेला मोगॅम्बो सुपरहिट ठरला होता. विशेष म्हणजे 1978 साली सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला होता.