कास्टिंग काऊच : सिनेसृष्टीतील महिलांच्या शोषणावर संसदेतही चर्चा

सरोज खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य  या विषयावर केली आहेत.

Updated: Apr 24, 2018, 09:09 PM IST

मुंबई : कास्टिंग काऊच, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान याबद्दल बोलल्या आणि त्यावर आता गरमागरम चर्चा होत आहेत. सिनेमा ते संसद कास्टिंग काऊचची चर्चा सुरू झाली आहे, त्यातच रेणुका चौधरींनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. कंगना, राधिका आपटे, काल्की कोचीन, सयामी खेर, टिस्का चोप्रा, समीरा रेड्डी, पायल रहतोगी, बॉलिवूडमधल्या या सगळ्या सेलिब्रिटींनी कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला आहे. नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांनी आता त्यावर नव्यानं भाष्य केलं आहे.सरोज खान हे इंडस्ट्रीतलं मोठं आणि आदरानं घेतलं जाणारं नाव माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय, विद्या बालन यांच्या नृत्यगुरू सरोज खान.

सरोज खान यांचा सवाल

बॉलिवूडच काय सरकारी अधिकारीही कास्टिंग काऊचमध्ये गुंतलेले असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पण त्याचवेळी एकट्या बॉलिवूडला कशाला दोषी धऱता, ते तर आमचं मायबाप आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बॉलीवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया

सरोज खान यांच्या वक्तव्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात कास्टिंग काऊच होतं, त्याला अगदी संसदही अपवाद नाही, अशी खळबळजनक प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या रेणूका चौधरींनी दिली आहे. तर भारतातल्या मुली कर्तृत्ववान आहेत, त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी असल्या गोष्टींचा आधार घेऊ नये, असं भाजप नेत्या शायना एनसी यांनी म्हटलं आहे.

निषेध करत स्वतःचे कपडे उतरवले होते

कास्टिंग काऊच हे सिनेसृष्टीला काही नवीन नाहीच. काही दिवसांपूर्वी दक्षिणेतल्या अभिनेत्रीनंही कास्टिंग काऊचचा निषेध करत स्वतःचे कपडे उतरवले होते. ब-याच क्षेत्रांत कास्टिंग काऊच असेलही. पण त्याचबरोबर सरोज खान य़ांनी एक महत्त्वाचं विधानही केलंय. कास्टिंग काऊचला बळी पडायचं की नाही, हे मुलींवरच अवलंबून असतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

कास्टिंग काऊच हे आता ओपन सिक्रेट झालं आहे. त्याला बळी पडायचं की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून योग्य मार्गानं स्वतःला सिद्ध करायचं, हा कळीचा मुद्दा असतो. पण सरोज खान यांच्या वक्तव्याच्या निमित्तानं या मुद्द्यावर चर्चा आणि राजकारणही रंगणार आहे.