पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...

बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2024, 07:42 PM IST
पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्... title=

बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. झारखंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची बहीण गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. यादरम्यान अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. सीसीटीव्हीत वाहनं आणि लोकांची रेलचेल असणाऱ्या रस्त्यावर कार अचानक दुभाजकावर जाऊन धडकताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 2 वर राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. 

सीसीटीव्हीत कार फार वेगात होती असं दिसत आहे. काही सेकंदात वेगाने येणारी ही कार दुभाजकावर जाऊन जोरात आदळताना सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान एक महिला यावेळी रस्ता ओलांडताना दिसत आहे. कार तिच्या अगदी जवळून जाते. सुदैवाने ती कारच्या समोर आली नाही आणि जीव वाचला. 

पंकजची यांच्या बहिण सरितादेखील कारमध्ये होत्या. दोघांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण राकेश तिवारी यांना रुग्णालयात नेताच मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान सरित यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून शरिरावर इतर अनेक जखमा झाल्या आहेत. सध्या धनबादमधील शहिद निर्मल महतो वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (SNMMCH) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे दोघेही बिहारच्या गोपाळगंज गावातून पश्चिम बंगालला निघाले होते. झारखंड येथून ते जात असताना हा अपघात झाला. पंकज त्रिपाठी यांनी या अपघातावर अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच हा दु:खद अपघात घडला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये, पंकज यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी त्यांच्या गावात गोपालगंज येथे निधन झाले होते.