गिरणी कामगाराचा मुलगा ते 'गिनिज बुका'त नोंद; सच्चा कलाकाराच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम

Dada Kondke 91th Birthday Today: ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट हे आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांच्याविषयीचा काही खास आणि रंजक गोष्टी. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 8, 2023, 11:35 AM IST
गिरणी कामगाराचा मुलगा ते 'गिनिज बुका'त नोंद; सच्चा कलाकाराच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम title=
August 8, 2023 | dada kondke marathi film superstar 91th birthday know the unknown facts about his life and death

Dada Kondke Death Reason: दादा कोंडके हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. त्याच्याप्रती असलेली आत्मियता आणि चाहत्यांचे प्रेम हे आजचंही कायम आहे. ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा आज 91 वा वाढदिवस आहे. 8 ऑगस्ट 1932 साली त्यांचा मुंबईतल्या चाळीत जन्म झाला होता. 70 ते 90 च्या काळात जेव्हा बॉलिवूडचे मोठमोठे अभिनेते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते तेव्हा मराठीच काय हिंदीमध्येही अभिनेते दादा कोंडके यांनी आपले स्वत:चे असे अढळ स्थान निर्माण केलेले होते. त्यांचा आगळावेगळा अभिनय सोबतच त्यांची भाषा आणि बोलण्याची पद्धत यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडला होता. त्यातून त्यांचे सिनेमे हे त्यावेळी बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी अनेक दिवस चित्रपटगृहात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले असून त्या चित्रपटांनी तिकीटबारीवरही तूफान कमाई केली होती. तेव्हा चला तर मग या लेखातून वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 

गिरणी कामगार कुटुंबात जन्म

दादा कोंडके यांचे कुटुंबीय हे बॉम्बे डाईंगच्या सूतगिरणीत काम करणारे होते. दादा कोंडके यांचे बालपण हे अत्यंत गरीब घरात गेले होते. त्यांचा जन्म हा गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला होता. तेव्हा मध्यमुंबईच्या नायगाव येथे गिरणी कामगारच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. या दोन योगायोगांमुळे त्यांचे नावं हे कृष्ण असंही ठेवण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील त्यांना दादा अशी हाक मारायचे त्यामुळे चित्रपटसृष्टीतही त्यांचे नाव दादा कोंडके असे होते. त्यांना त्याच नावानं ओळखले जायचे. 

चित्रपटाची किमया आणि लोकप्रियता 

दादा कोंडके यांचा 'पांडू' हा चित्रपट आल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. त्या लोकप्रियतेची झळ काय होती याचा किस्सा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही सांगितला होता. कारण या चित्रपटात ते दादा कोंडके यांच्यासोबत मुख्य भुमिकेत होते. अशोक सराफ याबद्दलचा किस्सा सांगताना म्हणाले होते की त्यांच्या या पहिल्याच चित्रपटानं त्यांना सुपरस्टार बनवले होते. चित्रपट सुरू झाला तेव्हा थिएटरमध्ये बसेपर्यंत कोणीही त्यांना ओळखत नव्हते परंतु त्याच अशोक मामांनी जेव्हा चित्रपट संपल्यानंतर थिएटर बाहेर पाऊल टाकले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली होती की त्या गर्दीतून जाताना त्यांना श्वास घेणेही मुश्किल झाले होते, अशी त्या चित्रपटाची किमया होती. 

हेही वाचा - Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos

'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

दादा कोंडके यांच्या चित्रपटांची नोंद ही 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही झाली होती. दादा कोंडके यांच्या 9 चित्रपटांनी सलग 25 आठवडे चालल्याबद्दल 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपलं स्थान शाबुत केले. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होण्यामागे हेही एक कारणं होतं. 

मृत्यूचं गुढ कायम

'सोंगाड्या' या चित्रपटानंही त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. दादा कोंडके यांचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी होती तेवढेच वैयक्तिक आयुष्यही फार वादग्रस्त होते. परंतु त्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यांनी याआधी नलिनी यांच्यासोबत लग्न केले होते. परंतु काही कारणास्तव ते दोघं विभक्त झाले त्यातून त्यांनी परत कधीच लग्न केले नाही. त्यांच्या मृत्यूचंही गूढ कायम आहे. मध्यंतरी टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका रिपोर्टमध्ये याबद्दल नोंदवले होते. 

दादा कोंडके यांचा मृत्यू हा 14 मार्च 1998 साली पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी झाला होता. त्यावेळी ते रमा निवास, दादर येथे राहत होते. त्यांना त्यानंतर दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. डॉ. अनील वाकणकर यांनी त्यांना आदल्यादिवशीच तपासले होते. त्यावेळी त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर समोर आलं होतं की सुश्रुषाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु अचानकपणे दादा कोंडके यांनी घरी नेण्यात आले होते.