PHOTOS : जान्हवीमध्ये दिसली श्रीदेवीची झलक....

जान्हवी कलाविश्वात आपलं करिअर घडवण्याच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे

Updated: Dec 12, 2018, 11:11 AM IST
PHOTOS : जान्हवीमध्ये दिसली श्रीदेवीची झलक....  title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने साऱ्या कलाविश्वातच एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. त्यांची एक्झिट अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली. कपूर कुटुंबीयांसाठी तर हा एक मोठा धक्का होता. पण, त्यातूनही आता ते कुठेतरी सावरताना दिसत आहेत. 

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी ही कलाविश्वात आपलं करिअर घडवण्याच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे, तर खुशीसुद्धा मॉडेलिंग श्रेत्रात आणि बॉलिवूडमध्ये तितकीच सहजतेनं वावरु लागली आहे. 'श्री'च्या या दोन्ही मुलींना त्यांच्या वडिलांची म्हणजेच बोनी कपूर यांचीही साथ मिळत आहे. 

विविध कार्यक्रम आणि मुलाखतींना जाणाऱ्या जान्हवीची तुलना बऱ्याचदा तिच्या आईशी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली जाते. तिचं दिसणं, वावरणं यांमध्ये अनेकदा श्रीदेवी यांची झलकही पाहायला मिळते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो पाहून पुन्हा एकदा याचीच प्रचिती आली आहे. 

बोनी कपूर यांच्यासह जान्हवीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.  यावेळी ती रॉयल ब्ल्यू या रंगाच्या साडीमध्ये अगदी श्रीदेवी यांच्याप्रमाणेच दिसत होती. चेहऱ्यावर आत्मविश्वास, तितकेच लक्षवेधी डोळे असा जान्हवीचा एकंदर लूक पाहून मिस्टर इंडिया या चित्रपटातील 'काटे नही कटते.....' या गाण्यातील निळ्या रंगाच्या साडीतील श्रीदेवी यांचीच आठवण अनेकांना झाली. 

सौंदर्याच्या परिभाषेला शह अनेकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या श्रीदेवी यांच्या अदांनी बऱ्याच वर्षांपूर्वी केलेली जादू पुन्हा एकदा जान्हवीही करत असल्याचीच प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली. 

दर दिवशी आपल्या वाट्याला येणाऱ्या संधीचं सोनं करत जान्हवी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख प्रस्थापिक करत आहे. 'धडक' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दणक्यात पदार्पण केल्यानंतर आता येत्या काळात ती 'तख्त' या मल्टीस्टारर ऐतिहासिक कथानकाच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठीच्या तयारीला तिने सुरुवात केली असून, कथानकाची गरज पाहता ती उर्दू भाषेचे धडेही गिरवत आहे.