'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Dharmaveer 2: 'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे. 

Updated: Dec 12, 2023, 02:46 PM IST
'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? title=

Dharmaveer 2: 'धर्मवीर 2' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या धर्मवीर सिनेमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली धुसपूस, पक्षफुटीचे प्लानिंग सुरु असतानाच हा सिनेमा आल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. 

'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे. यामध्ये 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' उलगडून सांगितली जाणार असल्याची जाहिरात केली जात आहे. मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व, पक्ष यावर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धर्मवीर 2 संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातील मुख्यमंत्र्यांच एक विधान चर्चेत आले आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट पाहताना काहीजण अर्ध्यावर उठून गेले. या सिनेमातील काही सिन्स त्यांना आवडले नव्हते.  त्यावर सेन्सॉर आलं होतं. पण आता धर्मवीर 2 मध्ये जे आहे ते वास्तव दाखवण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. म्हणजे दिघेसाहेबांद्दल सगळं.. कारण दिघेसाहेब एका सिनेमात मावू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता या आगामी चित्रपटात काय होणार? त्यावर कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटणार? हे येणाऱ्या काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे "धर्मवीर 2" चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.  एकंदरीतच "धर्मवीर" चित्रपटात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता "धर्मवीर २"मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.

"धर्मवीर 2" चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर'धर्मवीर 2'  आणि "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र "धर्मवीर 2" या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय,? हे समजून घेण्यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.