ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

कोल्हटकर यांनी दिग्दर्शीत केलेले 'मोरुची मावशी' हे नाटक मराठी रंगभूमिवर मैलाचा दगड ठरले. 

Updated: May 4, 2018, 02:40 PM IST
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन title=

पुणे : मराठी रंगभूमीला मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी (४ मे) सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निधन झालं . वयाच्या ७२व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी  अखेरचा श्वास घेतला घेतला. गेली कित्येक महिने ते आजारी होते. त्यांच्यावर उद्या (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेले 'मोरुची मावशी' हे नाटक मराठी रंगभूमिवर मैलाचा दगड ठरले. कोल्हटकर यांच्या पश्चात सासू आणि मुलगी असा परिवार आहे. दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली यांची ९ फेब्रुवारी २०१८ ला हत्या झाली होती.

प्रायोगिक आणि व्यावसायिक  प्रकारच्या नाटकांचे दिग्दर्शन

कोल्हटकर यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांपैकी  'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरूची मावशी',  'बिघडले स्वर्गाचे दार' या नाटकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यांच्या सर्वच नाटकांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला. 'पार्टी' (१९८४) आणि 'शेजारी शेजारी' (१९९१) या नाटकांचीही नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा झाली.

अखेरच्या काळात पुण्यात वास्तव्य

कोल्हटकर हे दिग्दर्शिका विजया मेहेता यांच्या नाटकांसाठी सुरूवातीला प्रकाशयोजना आणि नैपथ्याची जबाबदारी पार पाडत असत. त्यांना विजयाबाईंच्या 'जास्वंद' या नाटकात काम करण्याचीही संधी मिळाली. 'चिरंजीव आईस'  'गोड गुलाबी' आणि ' गोष्ट जन्मांतरीची' आदी नाटकांचेही त्यांनी दिग्दर्शन केले. बरीच वर्षे मुंबईत घालवलेल्या कोल्हटकरांनी २००२ नंतर पुण्यात वास्तव्य केले.