आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा, इतक्या वर्षांचं नातं....

दुराव्यास कारण की.... 

Updated: May 21, 2019, 11:01 AM IST
आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा, इतक्या वर्षांचं नातं....  title=

मुंबई : 'परफेक्शनिस्ट' आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या इम्रानने त्याच्या खासगी आयुष्याला नेहमीच महत्त्वं दिलं. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अवंतिका मलिक हिच्यासोबतच्या त्याने लग्नही केलं. 

इम्रान आणि अवंतिका यांच्या वैवाहिक आयुष्याकडे पाहून, परफेक्ट 'कपल गोल्स' देणारी ही जोडी अनेकांच्याच पसंतीस उतरली. त्यातही या दोघांच्या आयुष्यात इमारा या त्यांच्या चिमुरडीच्या येण्याने तर एका अर्थी इम्रान आणि अवंतिकाचं कुटुंब पूर्णच झालं. सोशल मीडियावरही त्यांच्या या आनंदी कुटुंबाचे काही खास क्षण पाहायला मिळाले. पण, सध्या मात्र त्यांच्या याच नात्याची एक वेगळी आणि अनपेक्षित बाजू समोर येत आहे. 

'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही गंभीर कारणांवरील मतभेदांमुळे इम्रान आणि अवंतिकाच्या नात्यात दुरावा आल्याची चिन्हं आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अवंतिकाने पाली हिल येथील त्यांच्या राहत्या घरातून काढता पाय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. 

Imran Khan and Avantika Malik

इम्रान आणि अवंतिकाच्या नात्यात आलेलं हे वळण अनेकांनाच धक्का देऊन जात आहे. मुळात त्यांच्यात असे कोणत्याही प्रकारचे मतभेद असतील असा अंदाजही कोणी वर्तवला नव्हता. त्यामुळे चाहत्यांच्या पचनीही ही बाब उतरत नसल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व चर्चा पाहता आता खुद्द इम्रान किंवा त्याची पत्नी अवंतिका या परिस्थितीविषयी काय वक्तव्य करतात याकडेच साऱ्याचं लक्ष लागलेलं आहे. तूर्तास मित्रमंडळी आणि कुटुंबातील काही सदस्य त्यांच्या नात्याला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.