Avatar 2 : 'अवतार 2' पाहताना आला हृदयविकाराचा झटका; तरुणाला गमवावा लागला जीव

Avatar 2 : पहिला भाग आल्यानंतर 13 वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे

Updated: Dec 17, 2022, 04:58 PM IST
Avatar 2 : 'अवतार 2' पाहताना आला हृदयविकाराचा झटका; तरुणाला गमवावा लागला जीव title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Avatar The Way of Water : जेम्स कॅमरून (James Cameron) यांचा बहुचर्चित 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा हॉलिवूडपट अखेर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहतो होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. चित्रपट रिलीज होताच, #AvatarTheWayofWater ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. मात्र आता हा चित्रपटत पाहत असतानाच एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाला आहे.

चित्रपटादरम्यान मृत्यू

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम शहरामध्ये अवतार चित्रपट पाहत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीरेड्डी श्रीनू असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो  आपल्या भावासोबत पेद्दापुरम येथे अवतार 2 चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. मात्र चित्रपट पाहत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी श्रीनू याच्यामागे एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

तैवानमध्येही मृत्यू

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार तैवान येथेही एका 42 वर्षीय व्यक्तीचा अवतार चित्रपटाचा पहिला भाग पाहत असताना मृत्यू झाला होता. 2010 मध्ये अवतार प्रदर्शित झालेला अवतार चित्रपट पाहत असताना या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आधीपासून होता. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चित्रपट पाहिल्यानंतर तो अतिउत्साही झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला.

अवतारची दमदार कमाई

अवतार 2 चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. 250 मिलियन डॉलर (2000 कोटी रुपये) मध्ये हा चित्रपट तयार करण्यात आलाय. अर्ली ट्रेण्डनुसार या चित्रपटाने भारतातच पहिल्या दिवशी 38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला आणखीन कमाई करावी लागणार आहे. 2028 पर्यंत या चित्रपटाचे 5 भाग प्रदर्शित होणार आहेत. जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिकनंतर 12 वर्षांनी अवतार बनवला आणि आता 13 वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग आला आहे. अवतार चित्रपटाच्या पहिल्या भागाने 24 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.