प्रार्थना बेहेरेचा 'हॉस्टेल डेज' २९ डिसेंबर रोजी होणार रिलीज

 प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Updated: Nov 15, 2017, 11:05 AM IST
प्रार्थना बेहेरेचा 'हॉस्टेल डेज' २९ डिसेंबर रोजी होणार रिलीज title=

मुंबई : प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा 'हॉस्टेल डेज' या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत.

हा चित्रपट २९ डिसेंबर २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय टांकसाळे आणि संजय जाधव हे कलाकारही महत्वाच्या भूमिकांमधून दिसणार आहेत.या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग ह्यांच्या श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.

"हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अजय नाईक यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.

चित्रपटाचे निर्माते सुभाष बोरा म्हणाले, "बहुआयामी अजय नाईक यांच्या दिग्दर्शनाखालील आमचा पहिला चित्रपट जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही हॉस्टेलमधील आयुष्यावर बेतलेली गोष्ट आहे. ती १९९० च्या दशकात आकाराला येते. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, स्मार्ट फोन नव्हते, केबल टीव्ही नव्हता की डिश टीव्ही नव्हता. इंटरनेट तर नव्हताच नव्हता. त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती. हॉस्टेलमधील आयुष्य त्यावेळी आता आहे त्याच्या कीतीतरीपट अधिक आकर्षक होते. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना येईल. हा संगीत चित्रपट त्यातील कर्णमधुर संगीतामुळे रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे."