राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...

अभिनेता प्रकाश राज त्याच्या स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे. 

Updated: Nov 12, 2017, 04:54 PM IST
राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याबाबत प्रकाश राज म्हणतो...  title=

बंगळुरू : अभिनेता प्रकाश राज त्याच्या स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश राजनं राष्ट्रगीताबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आवश्यक नाही, असं प्रकाश राज म्हणाला आहे.

तसंच मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. अभिनेते राजकारणामध्ये गेल्यामुळे माझ्या देशाचं नुकसानच झालं आहे. अभिनेत्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करणं मला आवडत नाही, कारण त्यांचे फॅन्स असतात. अभिनेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे, असं प्रकाश राज म्हणाला आहे.

अभिनेता कमल हसनप्रमाणेच प्रकाश राजही राजकारणात प्रवेश करेल अशा चर्चा होत्या. राजकीय पक्षाची स्थापना करण्याचे संकेत कमल हसननं अनेकवेळा दिले आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून कमल हसन राजकीय पक्षांवर टीका करत आहे. कमल हसनच्या हिंदू दहशतवादाबद्दलच्या लेखाचंही प्रकाश राजनं समर्थन केलं होतं.

जर धर्म, संस्कृती आणि नैतिकतेच्या नावावर भीती पसरवणं दहशत नाही तर काय आहे? असा सवाल प्रकाश राजनं विचारला होता. त्याआधी नोटबंदीवरून प्रकाश राजनं मोदी सरकारवर निशाणा साधला होता. नोटबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागतील का, असा सवाल प्रकाश राजनं उपस्थित केला आहे. तसंच नोटबंदी ही या काळातली सगळ्यात मोठी चूक असल्याचं प्रकाश राज म्हणाला होता.

मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली. यामुळे समाजातल्या फक्त काही लोकांचाच फायदा झाला. नोटबंदीनंतर बेकायदेशीरपणे काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोपही प्रकाश राजनं केला आहे. नोटबंदीमुळे श्रीमंतांना काळा पैसा पांढरा करायची संधी मिळाली पण असंघिटत कामगारांचं नुकसान झाल्याचं ट्विट प्रकाश राजनं केलं होतं.

याआधी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प का? असा सवाल, प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता. तसंच मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, असा टोलाही प्रकाश राजनं लगावला.

गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली माहिती नाही... मात्र, त्यांच्या हत्येनंतर विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला होता, असं प्रकाश राज यांनी म्हटलं होतं. असे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना समाज माध्यमांवर फॉलो करतात... तरीही नरेंद्र मोदी डोळे बंद करून असल्याचंही प्रकाश राज म्हणाले होते. या गोष्टीची आपल्याला भीती वाटते असं म्हणत, आपला देश कोणत्या दिशेला चाललाय? असा सवालही प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केला होता.