द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर : ज्वाला गुट्टाचा अनुपम खेर यांना बोचरा सवाल

गेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

Updated: Dec 31, 2018, 04:55 PM IST
द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर : ज्वाला गुट्टाचा अनुपम खेर यांना बोचरा सवाल title=

नवी दिल्ली : 'द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर बरेच चर्चेत आहेत. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करताना सोनिया गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यावरूनच आता भारतीय स्टार शटलर ज्वाला गुट्टा हिनं त्यांना काही सवाल केलेत. ज्वाला सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह दिसते. अनेकदा तिनं आपलं मतंही बेधडकपणे सोशल मीडियावर मीडियावर मांडलीत. आता तिनं अनुपम खेर यांना केलेल्या सवालामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

गेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या 'द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा संजय बारू यांच्या एका पुस्तकावर आधारीत आहे. या सिनेमात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळावर भाष्य करतानाच गांधी कुटुंबीयांची छबी वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याबरोबर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. 

या सिनेमात बारू यांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसतोय तर मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर यांनी निभावलीय. उल्लेखनीय म्हणजे, अनुपम खेर भाजपचे खंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप धुडकावून लावत अनुपम खेर यांनी 'या सिनेमात केवळ ऐतिहासिक तत्थ्यच दाखवण्यात आलेत त्यात आक्षेपार्ह काहीही नाही... सत्य कधीही बदलणार नाही' अशा शब्दांत सिनेमाचा बचाव केला.

यावर ज्वाला गुट्टा हिनं आपल्या एका ट्विटमध्ये अनुपम खेर यांना टॅग करतानाच एक बोचणारा सवाल केलाय. 'पद्मावत या सिनेमाच्या वादात अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला मंत्री धमकी देत होते... मला केवळ हे जाणून घेण्याची इच्छा आहे की अनुपम खेर यांनी त्यांचा निषेध केला होता का? मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु, मला काहीही सापडलेलं नाही... कृपया तत्थ्य जाणून घेण्यात माझी मदत करा' असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

यावर अनुपम खेर यांच्या एका समर्थकानं ज्वाला हिच्यासमोर अनुपम खेर यांचं एक ट्विट आणलं.. ज्यात खेर यांनी पद्मावतचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर त्यावर टीका केली होती... त्यावर लागलीच प्रत्यूत्तर देत ज्वालानं आणखी एक रिप्लाय दिला. 

'जेव्हा राज्य सराकारनं सिनेमावर बॅन लावला तेव्हा त्यांनी त्याविरोधात एक चकार शब्द काढला नव्हता... तसंच त्यांनी केवळ गुंडांवर टीका केली होती... दीपिकाला धमकी देणाऱ्या नेत्यांविरोधात मात्र ते गप्पच राहिले' असं म्हणत ज्वाला आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. 

पद्मावत या सिनेमाला विरोध करताना हरियाणाच्या एका भाजप नेत्यानं अभिनेत्री दीपिका पादूकोण हिचं मुंडकं उडवणाऱ्या व्यक्तीला १० करोड रुपयांचं बक्षीस देण्याची जाहीर घोषणा केली होती. त्याविषयी ज्वाला बोलत होती. 

उल्लेखनीय म्हणजे, 'द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर अनेक भाजप नेत्यांनी इतकंच काय तर भाजपच्या ऑफिशिअल हॅन्डलवरूनही शेअर करतानाच काँग्रेसवर आणि गांधी कुटुंबीयांवर टीका केलीय.