LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलं

LokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 03:51 PM IST
LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलं title=

LokSabha Election Voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासून काही मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. काही मतदान केंद्रांवर मात्र मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत आहे. आज मुंबईत मतदान होत असल्याने सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही आपला हक्क बजावत आहेत. यादरम्यान बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न कऱणाऱ्या नागरिकांसाठी शिक्षेची तरतूद केली पाहिजे असं मत मांडलं आहे. 

परेश रावल यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करणं किती महत्वाचं आहे याबद्दल सांगितलं. तसंच मतदान न करणाऱ्या नागरिकांप्रती संताप व्यक्त केला असून, त्यांना शिक्षा दिली पाहिजे असं म्हटलं आहे. 

"तुम्ही म्हणाल सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही. पण जर आज तुम्ही मतदान केलं नाही तर सरकार नाही, तर तुम्ही जबाबदार असाल," असं परेश रावल म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना आपलं कर्तव्य बजावण्यास सांगितलं. 

दरम्यान यावेळी त्यांनी जे मतदार मतदान करणार नाहीत त्यांना दंड ठोठावला जावा असं मतही मांडलं. ते म्हणाले की, "जे मतदान करत नाहीत त्यांच्यासाठी शिक्षेची काहीतरी तरतूद असायला हवी. म्हणजे कर वाढवणं किंवा दुसरी एखादी शिक्षा दिली जाी शकते".

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. अक्षय कुमार, शाहिद कपूर, सान्या मल्होत्रा, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवशी मुंबईतील आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केले.