समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

समीर चौगुले हे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

Updated: Jan 26, 2024, 11:45 PM IST
समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले title=

Samir Choughule New Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 

समीर चौगुले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यांनी समीर चौगुले सादर करीत आहे, दीड तास एकपात्री. सम्या सम्या मैफिलीत माझ्या, धमाल किस्से, गप्पा मनोरंजन , कथाकथन, लवकरच आपल्या भेटीस, असे लिहिले आहे. याबरोबर त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. 

समीर चौगुलेंचा नवीन कार्यक्रम

“भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. आजवर माझ्या प्रत्येक कामावर आपण सर्वांनी भरभरून प्रेम केलंत. त्याच जोडीला नवीन काहीतरी घेऊन येतोय. हलकफुलक, मनावर हळूवारपणे मोरपीस फिरवता फिरवता अलगद गुदगुल्या करून पोटधरून हसवणारं. एखाद्या जुन्या pant च्या खिशात ५०० ची नोट मिळवून देणारं. तुमचं, आमचं, अगदी आपलं घेऊन येतोय अगदी लवकरचं. प्रेम आणि आशिर्वाद असू दे.” असे कॅप्शन समीर चौगुलेंनी दिले आहे. 

समीर चौगुले हे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' असे त्यांच्या नव्या कथाकथनाच्या कार्यक्रमाचे नाव आहे. पण हे नक्की नाटक असणार की कार्यक्रम याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण त्यांच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार हे त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने यावर एक कमेंट केली आहे. त्यात त्याने "हा दिवस यायचा होता!! ही वेळ यायची होती!! तुझी मेहनत आणि सद्गुरू कृपा", असे म्हटले आहे. तर सचिन गोस्वामी, प्रसाद ओक, स्पृहा जोशी, वनिता खरात, सायली संजीव, ऋतुजा बागवे, मंजिरी ओक, सलील कुलकर्णी या कलाकारांनी  समीर चौगुलेंना शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान समीर चौगुले हे सध्या मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरजंन करताना दिसत आहे. सध्या ते महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्याआधी ते पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत झळकले होते. समीर चौगुले मालिकांबरोबरच चंद्रमुखी या चित्रपटातही झळकले होते.