'...अन् त्यांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत टाकलं', मतदान केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला घडलेला 'तो' प्रसंग

आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक मजेशीर पोस्ट केली आहे.  

Updated: May 22, 2024, 07:32 PM IST
'...अन् त्यांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत टाकलं', मतदान केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला घडलेला 'तो' प्रसंग title=

Sachin Goswami On Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचे मतदान सोमवारी (20 मे) पार पडले. यावेळी मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी आणि भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी 20 मे रोजी मतदानाचा हक्क बजावला. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक मजेशीर पोस्ट केली आहे.  

निवडणुकीच्या मतदानावेळी घडला किस्सा

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा लाखो चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. आता सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी घडलेला एक किस्सा सांगितला. 

सचिन गोस्वामी यांची पोस्ट

“काल मतदानाला मी आणि सविता सकाळी ७: ३०ला केंद्रावर गेलो. नेमका आमचा नंबर असलेल्या खोलीबाहेर मोठी रांग…ड्युटीवरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता. शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला.. ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा…मी गडबडलो…बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतेच…पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो.. आता मी ३ नंबरवर होतो..हळूच त्यांच्याकडे पाहून हसत थँक्यू म्हटलं…त्यावर तो म्हणाला ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का? पांढऱ्या केसांमुळे मला सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे…काय करावं…” असे सचिन गोस्वामी म्हणाले.

दरम्यान, सचिन गोस्वामींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. "पांढऱ्या केसांचा राजपुत्र होता म्हणून विशेष सेवा होती, उगी तुम्ही सिनियर सिटीझन म्हणून त्याचा बाऊ केला", असे एकाने म्हटले आहे. तर एकाने “हा स्किटचा विषय आहे” असे म्हटले आहे. तसेच एकाने “मी ही त्याच रांगेत आहे” असेही म्हटले आहे. त्यासोबतच एकाने “सिनियर म्हणून नाही सोडलं. राजपुत्र म्हणून पुढे जागा दिली”, “यावर एक जोरदार स्किट होऊन जाऊद्या चौघुलेंना घेऊन” अशा मजेशीर कमेंट्सही या पोस्टखाली पाहायला मिळत आहे.