गौरव मोरेचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला कायमचा रामराम, म्हणाला 'मी मनापासून माफी मागतो...'

अभिनेता गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 8, 2024, 12:41 PM IST
गौरव मोरेचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला कायमचा रामराम, म्हणाला 'मी मनापासून माफी मागतो...' title=

Gaurav More Exit Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ओळखले जाते. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरेने आता एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा संपूर्ण सेट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

गौरव मोरे काय म्हणाला?

"Hello everyone i am a gaurav more from powai filter pada.... Ta na na na na naaaaaa....आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…… रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.

महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे", असे गौरव मोरेने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

गौरवच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर समीर चौघुले यांनी तुला खूप शुभेच्छा...गौरव... खूप प्रेम, असे म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनी तुला खूप खूप शुभेच्छा, भविष्यात पुन्हा कधीतरी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसोबत काम करताना भेटू, अशा कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान गौरव मोरे हा सध्या सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमात झळकत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने बाहुबली या चित्रपटातील कालकेय या पात्राच्या लूकमधील फोटो पोस्ट केला होता. या फोटोत त्याला ओळखताही येत नव्हतं. त्यासोबतच लवकरच गौरव मोरे हा महापरिनिर्वाण या चित्रपटात झळकणार आहे.