'आज ती शरीराने आमच्यात नाही, पण...', मिलिंद गवळींची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाले '15 वर्षात...'

मिलिंद गवळी यांच्या आईचे निधन होऊन आज 15 वर्ष उलटली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Mar 2, 2024, 07:02 PM IST
'आज ती शरीराने आमच्यात नाही, पण...', मिलिंद गवळींची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाले '15 वर्षात...' title=

Milind Gawali Instagram Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतून अभिनेते मिलिंद गवळी यांना लोकप्रियता मिळाली. यात त्यांनी अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारले आहे. मिलिंद गवळी यांच्या आईचे निधन होऊन आज 15 वर्ष उलटली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या आईचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ 2003 मधील आहे. त्याबरोबरच त्यांनी या पोस्टला लांबलचक कॅप्शनही दिले आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि ती म्हण अगदी खरी आहे, अजून एक अशीच म्हण आहे “मातृदेवो भव:” ती पण म्हण खरी आहे, आज बरोबर पंधरा वर्षे झाले माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ , या पंधरा वर्षात अनेक वेळेला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वनीला सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकवीरा देवीच्या एकवीरा देवीच्या मंदिरात गेलो की त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतं. 

आज शरीराने ती आमच्यात नाहीये पण तिने हे देवीचे रूप धारण केलंय असंच मला वाटतं, जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो, आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून पण जगतोय, अनेक भूमिका कराण्याची मला संधी मिळाली आहे, अनेक नाती अनुभवता आली जगता आली आहेत , त्या सगळ्या नात्यांमध्ये “आईमुला” चं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला तोडच नाही, जगामध्ये त्याच्यापेक्षा पवित्र त्याच्यापेक्षा निर्मळ त्याच्यापेक्षा घट्ट नातं असूच शकत नाही असं माझं मत आहे, म्हणून मला सारखं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्याजवळ त्यांची आई आहे ते फार नशीबवान माणस आहेत.

माझी आई तर प्रेमाचा ,वात्सल्याचा न संपणारा झराच होती , तिने कधीही लहानमोठा ,गरीबश्रीमंत असा भेदभाव केला नाही, अन्नपूर्णा आणि सुगरण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची, आलेल्या कोण्याही पाहुण्याला अतिथी देवो भव समजून, त्यांच्या नोकऱ्यांना , ड्रायव्हरला सुद्धा तेवढ्याच आदराने आणि आग्रहाने पोटभर खाऊ घालायची, आणि एकदा का तिन्हे वाढलेल्या आग्रहाचे जेवण जेवून कोणी गेला असेल तर तिच्या हातच्या जेवणाची चव तो जन्मभर विसरायचा नाही. आजच्या दिवशी तिचे विचार , तिचं म्हणणं , तिचं जगणं , व्यक्त करावसं वाटलं, तिचं कायम आहे च म्हणणं होतं, फक्त निस्वार्थ प्रेम करा, काहीच अपेक्षा करू नका, आपण काय घेऊन आलोय? आणि आपण काय घेऊन जाणार? फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद !, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे. 

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. यावर एकाने आई वडीलाइतकं निस्वार्थी प्रेम कोणीही करू शकत नाही, अशी कमेंट केली आहे. तर एकाने खर आहे आई आणि वडील आपले दैवत आहेत, असे म्हटले आहे.