सई ताम्हणकरचा 'कार'नामा, चाहत्यांना कानमंत्र देत म्हणाली, 'कधीच कोणालाही...'

काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर खरेदी केले. यानंतर आता सईने एक अनोखा 'कार'नामा केला आहे.

Updated: Apr 10, 2024, 07:05 PM IST
सई ताम्हणकरचा 'कार'नामा, चाहत्यांना कानमंत्र देत म्हणाली, 'कधीच कोणालाही...' title=

Sai Tamhankar Buy Mercedes Benz : मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते. आता याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सईने गुढीपाडव्याच्या शुभदिनी नवीन कार खरेदी केली आहे. 

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव कायमच पाहायला मिळते. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका दिसली होती. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर खरेदी केले. यानंतर आता सईने एक महागडी कार खरेदी केली आहे. 

सई ताम्हणकरच्या अलिशान कारची झलक

सई ताम्हणकरने मर्सिडीज बेंझ ही अलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सई ताम्हणकरने तिच्या नव्या कोऱ्या गाडीची झलक दाखवली आहे. या व्हिडीओत सई ताम्हणकर ही गाडी खरेदी करण्यासाठी आल्याचे दिसत आहे. यावेळी ती काही फॉर्मवर सही करताना दिसत आहे. त्यानंतर सई तिच्या नवीन गाडीवरील कपडा काढत त्याची झलक दाखवताना दिसत आहे. यानंतर सई नव्या कारची पूजा करते आणि गाडीत बसून त्याच्या स्टेअरिंगला किस करताना दिसत आहे. यासोबतच सई ही तिच्या कुटुंबसोबतच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना मिठाई भरवतानाही दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

चाहत्यांना दिला कानमंत्र

यावेळी सई, सईची आई आनंदात भारावून गेल्याचे दिसत आहेत. सईने या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने सर्व चाहत्यांना कानमंत्र दिला आहे. "तुम्ही काय करु शकता किंवा काय करु शकत नाही हे कधीच कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, साध्य करा आणि ते स्वप्न जगा! आपण नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत. त्यामुळे लगेचच आपली नवीन ध्येय ठरवू आणि ती एकत्रपणे साध्य करुया. पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा", असे सई ताम्हणकरने कॅप्शन देताना म्हटले आहे. 

सई ताम्हणकरने पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेंझ ही कार खरेदी केली आहे. तिच्या नव्या कारची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये असल्याचे बोललं जात आहे. सईने स्वत:लाच ही अलिशान कार भेट म्हणून दिली आहे. सईने नवीन कार खरेदी केल्यानंतर आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, गौरव मोरे, स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, ऋता दुगुळे, प्राजक्ता माळी यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.