'14 फेब्रुवारीला मी...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन

या मुलाखतीत तिला व्हॅलेंटाईन डे कुठे साजरा करणार याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मनमोकळेपणाने उत्तर दिले. 

Updated: Feb 9, 2024, 07:20 PM IST
'14 फेब्रुवारीला मी...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन title=

Titeeksha Tawade Valentine Day Plan : मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत अभिनेत्री तितिक्षा तावडे हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. तितिक्षा ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तितिक्षा ही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. आता तितिक्षाने स्वत:च पहिल्या केळवणाचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्याबरोबरच तिने तिचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅनही सांगितला आहे. 

तितिक्षा तावडेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना तितिक्षा म्हणाली, "त्यानं मला डेटसाठी बोलावलं, पण नंतर पाहिलं तर ते केळवण निघालं." तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

तितिक्षा तावडेने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन

तितिक्षाने या पोस्टनंतर तिचा यंदाचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय असणार याबद्दल सांगितले आहे. तितिक्षाने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला व्हॅलेंटाईन डे कुठे साजरा करणार याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मनमोकळेपणाने उत्तर दिले. 

"प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. मी माझ्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ बोडकेला निरोप देऊ इच्छिते की, प्रेम काय आहे हे अजून कोणी डिकोड केलेलं नाही. तर आपण दोघे मिळून ते डिकोड करण्याचा प्रयत्न करु. थोडं तू चूक, थोडं मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊ. भरभरून प्रेम करायला शिकू. येत्या 14 फेब्रुवारीला मी 'सातव्या मुलाची सातवी मुलगी' या मालिकेचे शूटींगमध्ये व्यस्त असणार आहे. पण त्यानंतर जो काही वेळ मिळेल तो मी त्याच्यासोबत घालवणार आहे", असे तितिक्षा म्हणाली. 

तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेची लव्हस्टोरी

दरम्यान तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत ते दोघे एकत्र झळकले होते. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या दोघांनी थेट लग्नाची घोषणा केली आहे.