शाहीर साबळेंच्या स्मृतीदिनी केदार शिंदे भावूक, म्हणाले 'बाबा कित्येक पिढ्या तुमच्याबद्दल...'

प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजे शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांचे नातू, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Mar 20, 2024, 04:11 PM IST
शाहीर साबळेंच्या स्मृतीदिनी केदार शिंदे भावूक, म्हणाले 'बाबा कित्येक पिढ्या तुमच्याबद्दल...' title=

Kedar Shinde Emotional Post : 'महाराष्ट्र शाहीर' अशी ओळख मिळवलेल्या शाहीर साबळेंनी महाराष्ट्रातील लोककला घराघरात पोहोचवण्याचे काम केले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले. लोककला, पोवाडे आणि पथनाट्य या माध्यमातून त्यांनी जनजागृतीही केली. शाहीर साबळेंची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झाला. प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजे शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांचे नातू, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

केदार शिंदे हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शाहीर साबळे यांच्या स्केचचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

केदार शिंदेंची इन्स्टाग्राम पोस्ट

"बाबा.. शाहीर साबळे.. आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही अजूनही आहात. प्रत्येक माणसाच्या मनात आणि तुमच्या अलौकिक गाण्याने, प्रत्येकाच्या कानात. वर्षानुवर्षे तुम्ही स्मरणात रहाल, कित्येक पिढ्या तुमच्या बद्दल जाणून घेऊ शकतील म्हणून #महाराष्ट्रशाहीर सादर केला. तुम्ही जे कलात्मक संस्कार केलेत त्याची गुरूदक्षिणा....", असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे. 

त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते तसेच कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने, वैशाली सामंत, जयवंत वाडकर, सीमा घोगळे, मयुर पवार या कलाकारांनी केदार शिंदेंच्या पोस्टवर कमेंट करत शाहीर साबळेंना विनम्र अभिवादन करताना दिसत आहेत. शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. 

दरम्यान शाहीर साबळे यांचे निधन 20 मार्च 2015 रोजी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने झाले. ते 94 वर्षांचे होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना मांडली. या कार्यकमातून लावणी, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन  पाहायला मिळाले. अनेक वृद्ध व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.