मानस पुत्रासोबत सचिन पिळगावकर चालले कोकणात; एकत्र फेडणार नवस

वॅकी चालला नवस फेडायला, अभिनेते आणि दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच त्यांचा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. अशातच आता नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्नप्निल जोशीने केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Updated: Mar 19, 2024, 02:21 PM IST
मानस पुत्रासोबत सचिन पिळगावकर चालले कोकणात; एकत्र फेडणार नवस   title=

मुंबई : गायक, दिग्दर्शक, अभिनेते आणि डान्सचे महागुरू अशी ओळख असणारे मराठीतील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणजे सचिन पिळगावकर. एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगावकर यांनी रसिक प्रेक्षकांना उत्तम सिनेमे दिले आहेत. काही सिनेमे हे प्रदर्शित होऊन बरीच वर्ष लोटून गेली तरी ते प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. यातला एक सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. या सिनेमातील पात्र त्यांच्या संवादाला आजही प्रेक्षक वर्ग तेवढीच पसंती दर्शवतो. या सिनेमाचा दुसरा  भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याची  घोषणा नुकतीच झाली. अशातच आता सिनेमाच्या चित्रीकरणासाठी कलाकार मंडळी कोकणवारीला निघाले आहेत. 

या दुसऱ्या भागात स्वप्निल जोशी मुख्य भुमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. नुकतचं स्वप्निलने सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले असून नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. चाललो नवस फेडायला असं कॅप्शन देत स्वप्निलने ट्रेनमधल्या प्रवासातले फोटो पोस्ट केले आहेत. नवस फेडायला जाणाऱ्या व्यॅकीच्यासोबत त्याचे सहप्रवासी म्हणून वैभव मांगले, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत , हेमल इंगळे, ,सिद्धार्थ जाधव ही कलाकार मंडळी नव्या भागात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. 

त्यामुळे या दुसऱ्या भागात नवे कलाकार काय गंमती जंमती करणार याबाबत आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. वॅकीच्या नवसाची गोष्ट सांगणाऱ्या दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या दुसऱ्या भागाला प्रेक्षक पसंती आणि गणपतीपुळेचा बाप्पा नवसाला पावणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सोशल मिडियाच्या वापरामुळे हल्ली सिनेमांचं प्रमोशन करणं अगदी सहज सोपं झालं आहे. असं असलं तरी सगळेच सिनेमे हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. त्याउलट काही सिनेमांना प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरी त्यांची हॅंगओवर कायम तसाच असतो. मराठीतीत सदाबहार कलाकृती साकारत सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या मात्तबर अभिनेत्यांनी आपल्या सिनेमातून प्रेक्षकांचे फक्त मनोरंजनच केले नाही तर खळखळून हसायला ही लावलं. विशेषत:  बनवाबनवी आणि नवरा माझा नवसाचा या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता याच्या दुसऱ्या भागात व्यॅकी आणि इतर कलाकार मनोरंजनाची बॅटींग कसं करतायत या बद्द्ल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.