अतुल परचुरे म्हणतोय 'अळीमिळी गुपचिळी'

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Jan 11, 2020, 02:17 PM IST
अतुल परचुरे म्हणतोय 'अळीमिळी गुपचिळी' title=

मुंबई : आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. अशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतात. पण झी मराठी प्रेक्षकांसाठी एक असा चॅट शो सादर करणार आहे ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’ आणि या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेता अतुल परचुरे. त्याला साथ देण्यासाठी स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील या कार्यक्रमाचा हिस्सा असतील.

लहान मुलांना आपण नेहमी शिकवतो कि खोटं बोलल्यावर पाप लागतं. पण अनेकदा लहान मुलांच्या खरेपणामुळे आई-बाबा अडचणीत येत असतात. कलाकारांच्या बाबतीतही असे अनेक किस्से घडतात आणि हेच किस्से कलाकार ‘अळीमिळी-गुपचिळी’ मंचावर सगळ्यांसोबत शेअर करतील. 

लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो अळीमिळी गुपचिळी १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चॅट शोमध्ये कलाकार आणि त्यांच्या मुलांमधील मिश्कील संवाद प्रेक्षकांना अनुभवता येईल.

या मालिकेतून नवनवीन गोष्टी समोर येणार आहेत. या मालिकेचे आतापर्यंत कुशल बद्रिके आणि त्याचा मुलगा तर दुसऱ्या प्रोमोमध्ये अद्वैत दादरकर आणि त्याची मुलगी असे या दोन प्रोमोत आहेत. कलाकारांच्या पाठोपाठ आता त्यांची लहान मुलं देखील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.