इरफान खानचा कमबॅक; 'हिंदी मीडियम २' चित्रपटाच्या नावात बदल

इमरान खान आणि करीना कपूर यांच्या मुलीच्या भूमिकेत पटाखा फेम राधिका मदान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Apr 5, 2019, 04:52 PM IST
इरफान खानचा कमबॅक; 'हिंदी मीडियम २' चित्रपटाच्या नावात बदल title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता इरफान खानवर यूकेमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इरफान खान आता चित्रपटातून कमबॅकसाठी तयार आहे. नुकतंच राजस्थानमध्ये पोहचलेल्या इरफान खानने बहुचर्चित 'हिंदी मीडियम २' च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. परंतु चित्रीकरण सुरू होण्यासह या चित्रपटाचे बदललेले नावही समोर आले आहे. करीना कपूर आणि इरफान खानच्या या चित्रपटाचे नाव आता 'अंग्रेजी मीडियम' करण्यात आले आहे. 

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. उदयपूरमधील एका ठिकाणी संपूर्ण टीम असून या टीमसह इरफान खानही उत्साहात उभा आहे. या चित्रपटात करीना कपूर खानची प्रमुख भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट 'गुड न्यूज'चं चित्रीकरण संपल्यानंतर करीना मे महिन्यात लंडनमध्ये 'अंग्रेजी मीडियम'चं चित्रीकरण सुरू करणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये करीना एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.

'हिंदी मीडियम' या पहिल्या चित्रपटात इरफान खान आपल्या लहान मुलीच्या अॅडमिशनसाठी चिंतेत होता. तर आता 'अंग्रेजी मीडियम' या आगामी चित्रपटात इरफान खानची मुलगी कॉलेज स्टूडंड म्हणून काम करणार आहे. इमरान खान आणि करीना कपूर यांच्या मुलीच्या भूमिकेत पटाखा फेम राधिका मदान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचे होमी अदजानिया दिग्दर्शन करत असून दिनेश विजन चित्रपटाचे निर्माते आहेत. इरफानच्या आजारावरील उपचारानंतर 'अंग्रेजी मीडियम' इरफानचा पहिलाच चित्रपट आहे.