'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर

 ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 12, 2024, 04:11 PM IST
'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर title=

Singham Again Movies Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. 17 डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणी, संवाद यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर आता लवकरच ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात अजय देवगणने निडर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आता सिंघम अगेन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या चित्रपटाची टक्कर अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटासोबत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 

शूटींगला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, "सिंघम अगेन हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टी, अजय देवगण आणि चित्रपटाची संपूर्ण टीम 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिवसरात्र शूटींग करत आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. कारण सिंघम अगेन या चित्रपटात खूप अॅक्शन असून त्याचे शूटींग लक्षपूर्वक सुरु आहे." 

"त्यामुळे रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना चित्रपट एखाद्या ठराविक तारखेला प्रदर्शित व्हावा, यासाठी जाणूनबुजून घाई करायची नाही. तसेच या चित्रपटासाठी एक ठराविक दृष्टीकोन ठरवण्यात आला आहे. त्यामुळे यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही", अशी माहिती बॉलिवूड हंगामाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 

'सिंघम अगेन'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी यापूर्वीच जिओ स्टुडिओला याबद्दलची कल्पना दिली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला सिंघम अगेन आणि पुष्पा 2 या चित्रपटाची टक्कर होणार नाही. दरम्यान जिओ स्टुडिओकडून रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या टीमला दिवाळी 2024 पर्यंत चित्रपट प्रदर्शित करता येईल, असे सुचवले आहे. त्यामुळे सध्या दिवाळी 2024 चे डेडलाईन लक्षात घेऊन VFX आणि बॅकग्राउंड स्कोअर यात अपडेट केले जात आहे. त्यामुळे सिंघम अगेनची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले जात आहे.