'मी कदाचित मेलो असतो,' स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचा धक्कादायक खुलासा

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांची भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 32 किलो वजन कमी केलं होतं. पण यामुळे आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचं रणदीप हुड्डाने सांगितलं आहे.     

शिवराज यादव | Updated: Apr 10, 2024, 05:15 PM IST
'मी कदाचित मेलो असतो,' स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचा धक्कादायक खुलासा title=

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणदीप हुड्डावर (Randeep Hooda) सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 22 मार्चला हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणदीप हुड्डाने 'मिड-डे'शी या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने चित्रपटासाठी वजन कमी केल्यानंतर आपण जवळपास जीव गमावणार होतो असा खुलासा केला आहे. 

रणदीप हुड्डाने 2016 मधील सरबजीत चित्रपटासाठीही अशाच प्रकारे वजन कमी केलं होतं. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सरबजीत यांचा प्रवास किती वेगळा होता याबद्दल त्याने म्हटलं की, "या वेळी, माझे वजन दीड वर्षं कमी होते. जेव्हा आधीच्या निर्मात्यांनी चित्रपट गुंडाळला होता तेव्हा मी स्नायूंवरील मांस गमावलं होतं. मला बेशुद्द होऊन घोड्यावरुन पडल्याचं आठवत आहे.  मी बराच अशक्त असल्याची जाणीव मला होऊ लागली होती. तुम्ही स्वतःला बराच काळ अन्नापासून दूर ठेवता तेव्हा असंच होतं. मला चालताही येत नव्हतं".

जेव्हा पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली तेव्हा रणदीपला पुन्हा एकदा वजन कमी करण्याची गरज होती. पोलीस अधिकारी अविनाशच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाने वजन वाढवलं होतं. त्याचं वजन 92 किलो होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी त्याला हे वजन 60 किलोवर आणायचं होतं. 

रणदीपने सांगितलं की, "मला काही दिवस दिवसाला 1 किलो वजन कमी करायचं होतं. ते फार आव्हानात्मक होतं. मला अनेकदा फार अशक्त वाटायचं. मी बेशुद्धही पडायचो. एका अभिनेत्यासाठी या दिव्यातून जाणं फार भयानक आहे. पण प्रत्येक अभिनेत्याने याची काळजी घ्यावी असंही वाटतं. प्रत्येकाने हे केलं पाहिजे. मी काही गोष्टी ठरवल्या होत्या. पण त्या ठरवल्याप्रमाणे झाल्या नाहीत. त्यामुळे मला डाएट फॉलो करायला लागलो. मी फार कंटाळलो होतो. मला विनाकारण दोनदा मेहनत घ्यावी लागली. मी कदाचित मेलो असतो. मी इतक्या वाईट स्थितीत होतो. आता असं काही करताना मी एकाच व्यक्तीशी बांधील राहीन".

रणदीप हुड्डाने मुलाखतीत वजन कमी करण्याचा प्रवास शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास देणारा होता असं सांगितलं. आपण जेव्हा कधी अशा भूमिका स्विकारतो, तेव्हा आई-वडील पुन्हा असं वजन कमी करणार नाही असं आश्वासन घेतात. जर असं केलं तर आम्ही मुंबईत येऊन तुझ्यासोबत राहणार नाही असंही ते म्हणत असल्याचं रणदीप हुड्डाने सांगितलं. 

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे, अमित सियाल मुख्य भूमिकेत आहेत. 22 मार्चला चित्रपट हिंदी आणि मराठीत प्रदर्शित झाला आहे.