'त्यांनी एक तरी चांगली भूमिका...,' रत्ना पाठक यांचं वहिदा रहमान यांच्याबद्दल मोठं विधान, 'पुरस्कार देण्यापेक्षा...'

रत्ना पाठक 'धक-धक' चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी दुचाकी चालवणं शिकलं आहे. दरम्यान यानिमित्ताने त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना मिळालेल्या पुरस्कारावरही भाष्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 12, 2023, 06:49 PM IST
'त्यांनी एक तरी चांगली भूमिका...,' रत्ना पाठक यांचं वहिदा रहमान यांच्याबद्दल मोठं विधान, 'पुरस्कार देण्यापेक्षा...' title=

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि अभिनयासाठी विशेष ओळखल्या जातात. बॉलिवूडमध्ये वेगळ्या पठडीच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्यांचंही नाव घेतलं जातं. दरम्यान रत्ना पाठक सध्या 'धक-धक' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातही त्यांनी दमदार भूमिका स्विकारली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये त्या व्यग्र आहेत. यानिमित्ताने दिल्ल्या मुलाखतींमध्ये त्या बॉलिवूडसंबंधी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत आहेत. तसंच या चित्रपटाच्या निमित्ताने वयाच्या 65 व्या वर्षी आपण दुचाकी चालवणं शिकलो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेत्रींना आता बॉलिवूडमध्ये कामच मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. 

रत्ना पाठक या आपल्या अभिनयासह सडेतोड वक्तव्यांसाठीही ओळखल्या जातात. बॉलिवूडमधील स्टार कल्चर, अभिनय यावरुन त्यांनी अनेकदा रोखठोक मत मांडलं असून, मनोरंजनसृष्टीची दुसरी बाजूही समोर आणली आहे. नुकतंच रत्ना पाठक यांनी वहिदा रहमान यांना मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारावरुनही टोला लगावला आहे. महान अभिनेत्याला ही ओळख देणं पुरेसं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

रत्ना पाठक यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, "जेव्हा मी मेरिल स्ट्रीप (74) आणि हेलेन मिरेन (78) यांना पाहते, तेव्हा जर त्या हे असं करु शकतात तर मी का करु शकत नाही असा विचार मनात येतो. मला खंत वाटते की, आपल्या देशात वहिदा रहमान यांना ती भूमिका मिळत नाही ज्यासाठी त्या पात्र आहेत. त्या किती चांगल्या महिला आणि अभिनेत्री आहेत. पण त्यांना फक्त एक पुरस्कार देऊन, एका कोपऱ्यात बसवून ठेवावं इतकंच त्यांची इच्छा आहे. खरंच? देव त्यांना एक चांगली भूमिका देवो. पुरस्कार आपल्याजवळ ठेवा".

यावेळी त्यांनी आपल्याला आधी अभिनेत्रींचं एक ठरलेलं आयुष्य असतं असं वाटल्याचं म्हटलं. "आपण कसे दिसू लागलो आहोत, याच्याशी आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. आपलं शरीर आता बदलू लागलं आहे हे सत्य आहे. आणि जर तुम्हाला शरिराशी छेडछाड करायची नसेल तर आपण काय आणि कसे आहोत हे स्विकारावं लागेल. एक महिला म्हणून अभिनयाची शेल्फ लाइफ असते असं मला वाटलं होतं. मी जोवर सुंदर दिसते तोवर मी अभिनय करणार आणि त्यानंतर इतर काहीतरी काम करेन असा विचार केला होता. मी असा विचार केला होता याची मी कल्पनाही करु शकत नाही. पण हे सत्य आहे," असं रत्ना पाठक यांनी सांगितलं.