'4जी गर्ल'ला लागली लॉटरी

'एअरटेल गर्ल' किंवा '4जी गर्ल' म्हणून त्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आला आणि...

Updated: Oct 14, 2018, 10:50 AM IST
'4जी गर्ल'ला लागली लॉटरी title=

मुंबई: 'जमाना 4जी का है...' असं म्हणत एअरटेलच्या जाहिरातीतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली 'ती' मुलगी आठवतेय का? 'एअरटेल गर्ल' किंवा '4जी गर्ल' म्हणून त्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आला आणि पाहता पाहता ती ट्रेंडिंग विषयांमध्ये अग्रस्थानी दिसू लागली. 

साशा छेत्री असं या मुलीचं नाव असून, सध्या ती चित्रपट वर्तुळात पदार्पणाच्या तयारीत आहे. 

म्युझिशिअन, मॉडेलिंग आणि अभिनय विश्वात सक्रिय असणाऱ्या साशाला तिच्या करिअरमधील सुवर्णसंधी मिळाली आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याच्यासोबत एका आगामी चित्रपटामध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे ही जोडी झळकणार असून, साशाही त्यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त 'द न्यूज मिनिट'ने प्रसिद्ध केलं आहे. 

साशाने तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून सिनेजगतात पदार्पण केलं आहे. 'ऑपरेशन गोल्ड फिश' असं त्या चित्रपटाचं नाव असून, साई किरण अडिवी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. 

मुख्य म्हणजे साशाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या वाट्याला हा दुसरा चित्रपट आला आहे. तेव्हा आता हाती आलेल्या संधीचं सोनं करण्यात साशा यशस्वी ठरते का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.