अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video

Sonali kulkarni, Kunal Benodekar: आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती, तेव्हा...

Updated: Jul 13, 2023, 07:10 PM IST
अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video title=
Sonali kulkarni, Kunal Benodekar

Sonali kulkarni: मनोरंजन विश्वाची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने नेहमीच सगळ्यांना घायाळ करते. आपल्या दमदार अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनात तिने घर निर्माण केलं आहे. सोनालीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) लग्नगाठ बांधली. अशातच आता सोनाली कुलकर्णीने लग्नाआधीच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याबद्दलचे गुपित उलगडलं आहे.

काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?

माझं आणि कुणालचं बोलणं अनेक दिवसांपासून चालू होतं. आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती. रात्रीच्या 9 वाजता आम्ही भेटलो. मी तसं त्याला फोटोमध्ये पाहिलं होतं. तसाच तो दिसत होता. त्याच्या फोटोला ना कोणता फिल्टर ना आणखी काही. तो जरा फोटोत होता, तसाच समोर दिसत होता. भेटल्यानंतर आमचं बोलणं झालं. आम्ही एका ठिकाणी पिझ्झा खाण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तो मला अभिनेत्री म्हणून ओळखत नव्हता. त्याने माझं इन्स्टाग्रामवर माझं प्रोफाईल पाहिलं, त्यावेळी त्याला माझ्याबद्दल समजलं, असं सोनाली सांगते.

बोलत असताना त्याने मला विचारलं... तुझं फेमस गाणं कोणतंय? त्यावेळी मी सांगितलं 'अप्सरा आली'... त्यावेळी त्याने झटकन रिप्लाय दिला. याचं मोहम्मद अलीशी काही कनेक्शन आहे का? असा निरागस प्रश्न त्याने विचारला, असं सोनाली सांगते.  याला आपल्याबद्दल काहीही माहिती नाही, त्यामुळे असाच मुलगा माझ्या आयुष्यात येयला हवा, असं मी ठरवलं, असंही सोनाली सांगते.

आणखी वाचा - Kajol: नेत्यांची मापं काढणारी काजोल शिकलीये तरी किती?

दरम्यान, कुणाल बेनोडेकर याची 'केनो' या नावानेही त्याची ओळख आहे. त्याचं कुटुंबिय सध्या लंडनमध्ये राहतं. मात्र, तो कामानिमित्त दुबईत राहतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं होतं. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर 7 मे 2021 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.