'तारक मेहता ला उल्टा चष्मा'वर शोककळा; सदस्याचं निधन

 मालिकेचं चित्रीकरणही तातडीने थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला 

Updated: Feb 10, 2020, 09:44 AM IST
'तारक मेहता ला उल्टा चष्मा'वर शोककळा; सदस्याचं निधन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या आणि त्यांच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजनाचे आणि आनंदाचे क्षण देणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  taarak mehta ka ooltah chashmah  या मालिकेवर शोककळा पसरली आहे. ज्यामुळे मालिकेचं चित्रीकरणही तातडीने थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मालिकेसाठी मेकअप आर्टीस्ट म्हणून काम पाहणारे आणि कलाकारांना अनोख्या रुपात प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या आनंद परमार यांचं ८ फेब्रुवारीला निधन झालं. 

कांदिवली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालिकेतील सर्वच सदस्यांपैकी एका महत्त्वाच्या सदस्याचं निधन झाल्यामुळे अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून परमार यांची प्रकृती खालावली होती. असं असलं तरीही ते मालिकेच्या सेटवर येऊन आपलं काम करत होते. कामाप्रती त्यांची ही समर्पक वृत्तीसुद्धा अनेकांना हेवा वाटेल अशीच होती. 

जवळपास १२ वर्षांपासून ते या लोकप्रिय मालिकेशी जोडले गेले होते. आनंद परमार यांच्या निधनाचं वृत्त कळताच काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या मालिकेत डॉ. हाथी यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अंबिका रांजनकर यांनीही परमार यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 

मालिकेच्या सेटवर येऊन आपल्या अनोख्या कलेने किमया करणाऱ्या परमार यांच्या निधनानंतर एका दिवसासाठी मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. पुढे पुन्हा एकदा 'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत या मालिकेतील कलाकार त्यांच्या कामावर रुजू होतील. यावेळी आनंद परमार मात्र या साऱ्यांमध्ये कुठेच नसतील.